तालिबानला विराेध करणारा अखेरचा गड पंजशीर काेसळला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 09:08 AM2021-09-07T09:08:58+5:302021-09-07T09:09:05+5:30
संपूर्ण अफगाणिस्तान ताब्यात, लवकरच सरकार स्थापन करणार
काबूल : तालिबनला आतापर्यंत पंजशीर खाेऱ्यातून कडवा प्रतिकार झाला. मात्र, हा प्रांत अखेर पूर्णपणे तालिबानच्या ताब्यात गेला आहे. तालिबानने पंजशीरचा ताबा घेतल्याचे जाहीर केले. यापुढे काेणत्याही बंडखाेरांना साेडणार नाही, असा इशाराही तालिबानने दिला आहे. तालिबानी शिरल्यानंतर माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी पंजशीरमधून पळ काढला असून, ते ताजिकीस्तानमध्ये गेल्याचे वृत्त आहे. तर, लवकरच अंतरिम सरकार स्थापन करण्यात येईल, असे तालिबानने म्हटले आहे.
पंजशीरमध्ये राहणाऱ्या काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले, की रविवारी रात्री हजाराेंच्या संख्येने तालिबान्यांनी पंजशीर प्रांतातील आठ जिल्ह्यांचा ताबा घेतला. सर्व जिल्हा मुख्यालय, पाेलीस मुख्यालय तसेच इतर कार्यालयांचा तालिबानने ताबा घेतला. तालिबानचा विराेध करणाऱ्या नॅशनल रेजिस्टंस फ्रंट ऑफ अफगाणिस्तानसाेबत झालेल्या तुंबळ युद्धात शेकडाे जणांना ठार केल्याचा दावाही तालिबानने केला. तालिबानचा प्रतिकार करणाऱ्या गटाचा प्रमुख अहमद मसूद याचा अतिशय जवळचा फहीम दश्ती याचाही रविवारच्या युद्धात मृत्यू झाला. त्यानंतर पंजशीरच्या विराेधी गटाने तालिबानसाेबत युद्धबंदीची मागणी करून चर्चेद्वारे समस्या साेडविण्याची मागणी केली हाेती.
सत्तासंघर्ष लवकरच मिटण्याची शक्यता
nअफगाणिस्तानात लवकरच सरकारची घाेषणा करण्यात येणार असल्याचे तालिबानचा प्रवक्ता झबीउल्ला मुजाहिद याने पुन्हा सांगितले आहे.
तालिबानच्याच वेगवेगळ्या गटांमध्ये असलेल्या मतभेदामुळे सरकार स्थापनेला विलंब हाेत आहे. तालिबानचा सहसंस्थापक मुल्ला अब्दुल गनी बरादर आणि अनस हक्कानी यांच्यात सत्तासंघर्ष सुरू असल्याची चर्चा हाेती.
nगेल्या आठवड्यात काबूलमध्ये झालेला गाेळीबार हा याच दाेन नेत्यांच्या सत्तासंघर्षातून झाला हाेता. त्यात बरादर हे जखमी झाल्याचेही सांगण्यात आले हाेते. मात्र, काेणतेही मतभेद नसल्याचाही दावा त्याने केला आहे.
nताे म्हणाला, की पंजशीर जिंकल्यानंतर देश आता युद्धमुक्त झाला आहे. लवकरच एक अंतरिम सरकार स्थापन केले जाईल. त्यात नंतर बदलही केले जाऊ शकतात. सध्या काही तांत्रिक मुद्यांवर काम सुरू आहे. त्यातून ताेडगा निघाल्यानंतर सरकारची घाेषणा करण्यात येईल.
सालेह पंजशीर साेडून पळाले ?
विद्राेही गटाचे नेतृत्व करणारे अमरुल्ला सालेह हे पंजशीर साेडून पळाल्याचा दावा तालिबानने केला आहे. ते ताजिकीस्तानला गेल्याची दाट शक्यता आहे. मात्र, काही जणांनी हा दावा फेटाळला असून, सालेह हे भूमिगत झाल्याचे सांगण्यात येत आहे. नेहमी ट्विटरवर सक्रिय असणारे सालेह यांनी सद्यस्थितीबाबत काेणतीही माहिती दिलेली नाही.