मरण्याआधी अमेरिकेत रक्तपात पाहण्याची अल जवाहिरीची शेवटची इच्छा
By admin | Published: April 22, 2017 05:09 PM2017-04-22T17:09:07+5:302017-04-22T17:18:00+5:30
अलकायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आयमन अल जवाहिरीची अमेरिकेवर हल्ला करण्याची शेवटची इच्छा आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - अलकायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आयमन अल जवाहिरीने त्याची शेवटची इच्छा बोलून दाखवली आहे. डोळे मिटण्याआधी अमेरिकेवर मोठा हल्ला करण्याची जवाहिरीची इच्छा आहे. मरण्याआधी अमेरिकेत आपल्याला मोठा रक्तपात झालेला पाहायचा आहे असे त्याने जवळच्या सहका-यांजवळ बोलून दाखवले. न्यूजवीकने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. जवाहिरी आणि हमजा बिन लादेन या दोघांना आयएसआय या पाकिस्तानच्या गुप्तचर संघटनेने आसरा दिल्याची शक्यता असून, हे दोघे कराचीमध्ये असावेत असे न्यूजवीकने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे.
अमेरिकेने अफगाणिस्तानात अलकायदा विरुद्ध मोहिम उघडल्यापासून पाकिस्तान अल जवाहिरीला संरक्षण देत आहे. अमेरिका जवाहिरीच्या मागावर असून, मागच्यावर्षी जानेवारी महिन्यात अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यातून जवाहिरी थोडक्यात बचावला होता असे न्यूजवीकने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे.
जवाहिरी ज्या खोलीत होता त्याच्या पुढच्या खोलीवर अमेरिकेने ड्रोन हल्ला केला. त्यावेळी दोन खोल्यांना जोडणारी भिंत कोसळून ढिगारा जवाहिरीच्या अंगावर पडला. त्यात त्याचा चष्मा तुटला. पण सुदैवाने तो बचावला असे दहशतवाद्याने न्यूजवीकला सांगितले. 2001 पासून अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यातून जवाहिरी अनेकदा बचावला आहे. ज्या अफगाणिस्तानमध्ये जवाहिरी-लादेन जोडीने राज्य केले त्याच अफगाणिस्तानातील काही भागांमध्ये आता जवाहिरीला थारा दिला जात नाही असे न्यूजवीकने म्हटले आहे.