इसिसचा म्होरक्या अल बगदादी ठार, सीरियन निरीक्षकांचा दावा
By admin | Published: July 11, 2017 07:13 PM2017-07-11T19:13:51+5:302017-07-11T19:57:45+5:30
सीरिया, इराकमध्ये क्रौर्याचा कळस गाठणा-या इसिस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबु बकर अल बगदादी ठार झाल्याचे वृत्त आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
अलेप्पो, दि. 11 - सीरिया, इराकमध्ये क्रौर्याचा कळस गाठणा-या इसिस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबु बकर अल बगदादी ठार झाल्याचे वृत्त आहे. सीरियामधील निरीक्षक गटाने सूत्रांच्या हवाल्याने हा दावा केला आहे. सीरियामध्ये मानवी हक्कासाठी हा निरीक्षकांचा गट कार्यरत आहे. यापूर्वी सुद्धा अनेकवेळा बगदादी ठार झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
निरीक्षकांचा हा गट सीरियामधील गृहयुद्धावर विश्वसनीय माहिती देण्यासाठी ओळखला जातो. सीरियाच्या पूर्वेकडे असणा-या डायर-अल-झोर शहरातील सूत्रांच्या हवाल्याने निरीक्षकांच्या गटाने बगदादी ठार झाल्याचे म्हटले आहे. पण तो कधी मारला गेला ते निरीक्षकांच्या गटाने स्पष्ट केलेले नाही. इसिसशी संबंधित असणा-या वेबसाईट किंवा सोशल मीडियाने अद्यापपर्यंत बगदादीच्या मृत्यूसंबंधी कोणतेही वृत्त दिलेले नाही. दोन दिवसांपूर्वीच इराकी सैन्याने इसिसच्या ताब्यातून मोसूल शहर परत मिळवल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता बगदादीच्या खातम्याचा दावा करण्यात येत आहे.
आणखी वाचा
मागच्या महिन्यात रशियाने बगदादीला ठार मारल्याचा दावा केला होता. हवाई हल्ल्यात बगदादी ठार झाल्याचे रशियाचे म्हणणे होते. रशियाने सिरियामधील रक्का येथे केलेल्या हवाई हल्ल्यात अबू बकर अल-बगदादी ठार झाल्याची माहिती होती.
मे महिन्याच्या शेवटी रशियाने हा हवाई हल्ला केला होता. रशियाला इसीसच्या प्रमुखांची बैठक होणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली होती. यानंतर हा हवाई हल्ला करण्यात आला अशी अधिकृत माहिती मंत्रालयाने आपल्या फेसबूक पेजवरुन दिली होती.
8 मे रोजी इसीसच्या प्रमुखांमध्ये होणा-या बैठकीची जागा आणि वेळ माहिती करुन घेण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला. त्यानंतर रात्री 12.30 ते 12.45 दरम्यान हवाई दलाने ज्या ठिकाणी बैठक सुरु होती त्या कमांड पॉईंटवर हवाई हल्ला केला", अशी माहिती मंत्रालयाने दिली होती.
मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीला इसीसचा म्होरक्या अबू बकर अल-बगदादी देखील उपस्थित होता. या हवाई हल्ल्यात तो ठार झाला आहे अशी माहिती होती. हल्ल्यात इसीसचे अनेकजण ठार झाले होते. जवळपास 30 फिल्ड कमांडर्स आणि 300 पर्सनल गार्ड ठार झाले असल्याचा दावा रशियन संरक्षण मंत्रालयाने केला होता.