सत्तेत आले नाहीत तोच भ्रष्टाचारात बरबटले मोईज्जू; मालदीवमध्ये गुप्त अहवाल फुटल्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 10:46 PM2024-04-17T22:46:47+5:302024-04-17T22:47:41+5:30
Mohammad Muizzu is corrupt: मालदीव संसदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. अशातच मोईज्जू यांच्याविरोधात एक गुप्त अहवाल लीक झाल्याने खळबळ उडाली आहे.
मालदीवमध्ये भारतविरोधी सरकार आले आहे. मालदीवमध्ये सेवा देत असलेल्या भारतीय जवानांना राष्ट्रपती मोहम्मद मोईज्जू यांनी देश सोडण्यास सांगितले आहे. मालदीव संसदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. अशातच मोईज्जू यांच्याविरोधात एक गुप्त अहवाल लीक झाल्याने खळबळ उडाली आहे.
मोईज्जू यांच्यावर या अहवालात भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. हा रिपोर्ट लीक होताच विरोधी पक्ष ताकदवर झाला असून मोईज्जूंविरोधात महाभियोग आणण्याची तयारी सुरु केली आहे. मोईज्जू यांनी त्यांच्यावरील आरोपांचे खंडन केले आहे. मालदीवच्या संसदेची निवडणूक येत्या रविवारी होणार आहे. या रिपोर्टमुळे विरोधी पक्ष मालदिवीयन डेमोक्रेटीक पार्टी आणि मोईज्जू यांची पिपल्स नॅशनल काँग्रेस पक्षामध्ये आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत.
सोशल मीडियावरील हसन कुरुसी या हँडलवरून हा गुप्त अहवाल पोस्ट करण्यात आला होता. यानंतर मालदीवमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. फायनान्शिअल इंटेलिजन्स युनिटद्वारे हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. यामध्ये मालदीव मॉनेटरी अथॉरिटी आणि मालदीव पोलीस सर्व्हिसशी संबंधीत काही कागदपत्रे आहेत. या कागदपत्रांमध्ये मोईज्जू यांनी भ्रष्टाचार केल्याचे उल्लेख आहेत.
मोईज्जू यांच्या खासगी बँक खात्यांमध्ये अनेक संशयास्पद ट्रान्झेक्शन आहेत. या कागदपत्रांमध्ये २०१८ च्या काही घटनांचाही उल्लेख आहे. हे व्यवहार लपविण्यासाठी मोईज्जू यांनी राजकीय ताकद वापरल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तसेच कार्पोरेट संस्थांद्वारे हा पैसा कुठून आला हे लपविण्यात आल्याचेही यात म्हटले आहे.