अमेरिकेची गोपनीय कागदपत्रे लीक; इस्रायल कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला करण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 10:23 AM2024-10-20T10:23:57+5:302024-10-20T10:25:10+5:30
Israel Iran War: अमेरिकेच्या सॅटेलाईटने असे काही फोटो मिळविले आहेत ते पाहून इस्रायल इराणवर मोठ्या हल्ल्याची तयारी करत आहे, हे स्पष्ट होत आहे.
इस्रायल कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला करण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे गोपनीय कागदपत्रे लीक झाल्याने खळबळ उडाली आहे. गाझा, लेबनानवरील हल्ल्यानंतर इस्रायल आपला मोर्चा इराणकडे वळविण्याची शक्यता या कागपत्रांमध्ये व्यक्त करण्यात आली आहे.
न्यूयॉर्क टाईम्सने या लीक झालेल्या कागदपत्रांवरून बातमी छापली आहे. यानुसार अमेरिकेच्या सॅटेलाईटने असे काही फोटो मिळविले आहेत ते पाहून इस्रायल इराणवर मोठ्या हल्ल्याची तयारी करत आहे, हे स्पष्ट होत आहे. इस्रायल आपल्या सैन्य दलाच्या साच्यात मोठा बदल करत आहे. शस्त्रास्त्रांची मोठ्या प्रमाणावर जमवाजमव सुरु केली आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इराणचे समर्थन करणाऱ्या काही अकाऊंटवरून हे डॉक्युमेंट लीक करण्यात आले. १५ व १६ ऑक्टोबरला हे लीक झाल्याने खळबळ उडाली होती. या दस्ताऐवजानुसार इस्रायली सैन्य मोठ्या लष्करी सरावात गुंतलेले असल्याचे समोर आले आहे.
नॅशनल जिओस्पेशिअल-इंटेलिजन्स एजन्सी (एनजीए) ची ही कागदपत्रे आहेत. 1ऑक्टोबरला इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केला होता. यानंतर इस्रायल मोठा पलटवार करेल अशी अपेक्षा होती. परंतू, इस्रायलने गाझा आणि लेबनानवर हल्ले सुरु ठेवले होते. आता लेबनानमध्ये हिजबुल्लाचा दुसरा प्रमुखही संपविण्यात आला आहे. हिजबुल्लाने शनिवारी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. हा हल्ला इराणच्या मदतीने केल्याचा आरोप इस्रायलने केला होता.
इराणने इस्रायलव सुमारे २०० क्षेपणास्त्रे डागली होती. हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसराल्लाह आणि हमास प्रमुख इस्माईल हनिया यांच्या मृत्यूचा बदला होता, असे इराणकडून म्हटले गेले होते. यापैकी बहुतांश क्षेपणास्त्रे इस्रायलने हवेतच नष्ट केली होती. तर काही क्षेपणास्त्रे इस्रायलवर आदळली होती. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तो देखील गाझावासी होता.