अफगाणिस्तानातील काबूलमध्ये दोन बॉम्बस्फोट; 20 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 08:14 AM2018-09-06T08:14:33+5:302018-09-06T08:19:11+5:30
बॉम्बस्फोटात 50 हून अधिक नागरिक जखमी
काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये दोन मोठे बॉम्बस्फोट झाले आहेत. यामध्ये 20 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. काबूल शहरातील क्रीडा संकुलात बुधवारी संध्याकाळी हे स्फोट झाले. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेनं या स्फोटांची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
काबूलमध्ये बुधवारी संध्याकाळी 6 च्या सुमारास बॉम्बस्फोट झाले. यातील पहिला स्फोट कला-ए-नजरिया परिसरातील स्पोर्ट्स क्लबमध्ये झाला. एका आत्मघाती हल्लेखोरानं हा स्फोट घडवला. यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला. तर 30 जण जखमी झाले. यानंतर लगेचच दुसरा बॉम्बस्फोट झाला. यात 6 जण मृत्यूमुखी पडले. देशाचे माजी अध्यक्ष हमीद करझाई यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं. 'मी काबूलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध करतो. या हल्ल्यात अनेक अॅथलिट्स, पत्रकार आणि सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबाबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. आम्ही दहशतवादाविरोधात देश म्हणून एकत्र आहोत, याची आमच्या शुभचिंतकांना कल्पना आहे', असं करझाई यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
I strongly condemn the terrorist attack in #Kabul that inflicted casualties on our people including our brave journalists & athletes. Our ill-wishers must know that our people stand united against their terrorism. I extend my profound sympathies to the victims’ families & friends
— Hamid Karzai (@KarzaiH) September 5, 2018
क्रीडा संकुलातील खेळाडू आणि पोलिसांना लक्ष्य करण्यासाठी हे बॉम्बस्फोट घडवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या हल्ल्यात किती णांचा झाला आणि किती जण जखमी झाले, याची अधिकृत माहिती अद्याप अफगाणिस्तान सरकारनं दिलेली नाही. स्थानिक वृत्तवाहिनी टोलो न्यूजच्या दोन पत्रकारांनी या हल्ल्यात प्राण गमावला आहे. पहिला बॉम्बस्फोट होताच टोलो न्यूजचे दोन पत्रकार घटनास्थळी वृत्तांकन करण्यासाठी पोहोचले. मात्र तितक्यात दुसरा स्फोट झाला आणि त्यामध्ये दोन्ही पत्रकारांचा मृत्यू झाला.