इंडोनेशियातील भूकंपात आतापर्यंत 82 लोकांचा मृत्यू, 100हून अधिक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 06:46 AM2018-08-06T06:46:23+5:302018-08-06T07:11:29+5:30
इंडोनेशिया या देशाला भूकंपाचे जोरदार हादरे बसले आहेत.
जकार्ता- इंडोनेशिया या देशाला भूकंपाचे जोरदार हादरे बसले आहेत. या भूकंपामुळेइंडोनेशियामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानीसह वित्तहानी झाली आहे. आतापर्यंत या भूकंपात 82 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 100हून अधिक जण जखमी आहेत. लोम्बोक आयलँडजवळ या भूकंपाचा केंद्रबिंदू दाखवण्यात आला आहे.
या भूकंपामुळे अनेक इमारतींचं नुकसान झालं असून, स्थानिक लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हेनुसार या भूकंपाची तीव्रता सात रिश्टर स्केल एवढी मोजण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू लोम्बोकच्या उत्तर भागातल्या जमिनीच्या 10.5 किलोमीटर खोलवर दाखवण्यात आला आहे. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, ते बाली द्विपसमूहापर्यंत जाणवले. या भूकंपानंतर त्सुनामीचाही इशारा देण्यात आला होता. परंतु आता त्सुनामी येणार नसल्याचं हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे. भूकंपामुळे नुकसान झालेल्या इमारतीमध्ये विमानतळ टर्मिनल इमारतीचाही समावेश आहे. तीन गावांच्या समुद्रकिना-यावर फक्त 15 सेंटीमीटरपर्यंत लाटा उसळल्यानंतर सुनामीचा इशारा रद्द करण्यात आला आहे.
लोम्बोक आपत्कालीन विभागाचे अधिकारी इवान अस्मारा म्हणाले, भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर माणसं भीतीनं घराबाहेर आली. तसेच कोसळलेल्या इमारतींमध्ये निकृष्ट दर्जाचं बांधकाम साहित्य वापरण्यात आलं होतं, असं इंडोनेशिया आपत्ती निवारण यंत्रणेचे प्रवक्ते सुतोपो पूर नोग्रोहो यांनी सांगितलं. मागील काही दिवसांपूर्वी इंडोनेशियातल्या लोम्बोकलाच भूकंपाचा फटका बसला होता. त्यावेळी आलेल्या भूकंपात जवळपास 14 जण जीवानिशी गेले होते, तर अनेक जण जखमी होते. भूकंपामुळे हजारो लोकांची घरं उद्ध्वस्त झाली होती.