मुदतीत देश सोडा, अन्यथा परिणाम भोगा; तालिबानने अमेरिकेला दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 06:05 AM2021-08-25T06:05:49+5:302021-08-25T06:06:08+5:30
अमेरिका आणि नाटोचे सैनिक काबूल विमानतळावर बचाव मोहिमेत गुंतले आहेत. मात्र, ३१ ऑगस्टची मुदत पाळणे अतिशय कठीण झाले आहे.
काबूल : तालिबाननेअफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर अमेरिकेसमोर संपूर्ण सैन्य माघारीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत आहे. काबूल विमानतळावरील गोधळाच्या परिस्थितीमुळे अजूनही शेकडो अडकले आहेत. त्यामुळे ही मुदत पाळणे अमेरिकेसाठी अतिशय कठीण झाले आहे. त्यातच अमेरिकेने आपल्या सैनिकांना माघारी बोलाविण्यास उशीर केल्यास गंभीर परिणाम अमेरिकेला भोगावे लागतील, अशी धमकी तालिबानने दिली आहे.
अमेरिका आणि नाटोचे सैनिक काबूल विमानतळावर बचाव मोहिमेत गुंतले आहेत. मात्र, ३१ ऑगस्टची मुदत पाळणे अतिशय कठीण झाले आहे. बचाव मोहीम पूर्ण न झाल्यास अमेरिकेचे सैनिक ३१ ऑगस्टनंतरही अफगाणिस्तानात राहू शकतात, असे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन म्हणाले होते. अमेरिकेने मुदतवाढीसाठीही तालिबानला संपर्क केला होता. मात्र, तालिबानने हीच मुदत कायम ठेवली आहे. निर्धारित मुदतीत अमेरिकेने अफगाणिस्तान सोडण्याचा इशारा दिला आहे. तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीनने सांगितले, की अमेरिकेने मुदत वाढविल्यास संबंध खराब होतील. अविश्वास निर्माण होईल.
पंजशीर खोरे ताब्यात घेण्याचा तालिबानचा प्रयत्न उधळून लावल्यानंतर अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी कडक इशारा दिला आहे. अफगाणिस्तानचा तालिबानीस्तान होऊ देणार नाही, असे सालेह यांनी तालिबानला स्पष्टपणे बजावले आहे. अफगाण नागरिकांना स्वतंत्रपणे जीवन जगण्याचा अधिकार आहे. त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळायला हवी. दडपशाहीत हे शक्य नाही आणि आम्ही दडपशाही सहन करणार नाही, असे सालेह यांनी तालिबानला बजावले आहे. तालिबानने पंजशीरमधील भाग ताब्यात घेतल्याचे वृत्तही सालेह यांनी फेटाळले.