आजारी असताना रजा दिली नाही; महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 09:57 AM2024-09-28T09:57:52+5:302024-09-28T09:58:15+5:30
जगभरात महिला कर्मचाऱ्यांवरील अतिताणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत
बँकॉक : पुण्यात अतिताणामुळे सीए तरुणीचा, उत्तर प्रदेशात महिला बँक कर्मचाऱ्याचा काम करत असतानाच खुर्चीवरून पडून मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या असतानाच आता थायलंडमध्येही कार्यालयात काम करीत असताना एका महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
३० वर्षीय कर्मचाऱ्याची तब्येत बरी नसल्याने तिने बॉसकडे सुट्टीची मागणी केली होती. मात्र, बॉसने तिचा रजेचा अर्ज फेटाळल्याने ती कार्यालयात आली असता अचानक बेशुद्ध पडली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यामुळे कर्मचाऱ्यांवरील अतिताणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
नेमके काय झाले?
मे नावाची ही महिला कर्मचारी थायलंडमधील समुत प्राकन प्रांतातील एका इलेक्ट्रॉनिक्स प्रकल्पात काम करीत होती. ती आतड्यांमध्ये सूज आल्याने त्रस्त होती. आपल्यावर उपचार करण्यासाठी तिने वैद्यकीय प्रमाणपत्रासह ५ ते ९ सप्टेंबर या कालावधीत सुट्टी घेतली होती. यादरम्यान ती रुग्णालयात होती. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ती बरी होत होती; पण, काम करण्याच्या स्थितीत नव्हती. अशा परिस्थितीत तिने १० आणि ११ सप्टेंबरला सुटी घेतली.
बॉस म्हणतो, कामावर या अन्यथा नोकरी गमवा
तब्येतीत सुधारणा होत नसल्याचे पाहून महिलेने १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी बॉसला तब्येत ठीक नसल्याचे सांगत आणखी एक दिवस सुट्टीची मागणी केली. मात्र, तुम्ही आधीच अनेक दिवस सुट्टी घेतली आहे. तुम्हाला कामावर यावेच लागेल; अन्यथा नोकरी गमवावी लागेल, असा इशारा बॉसने तिला दिला.
त्यामुळे घाबरून महिला १३ सप्टेंबर रोजी कामावर गेली. काही वेळ ऑफिसमध्ये काम केल्यानंतर ती बेशुद्ध पडली. तिला रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली; मात्र, तिला वाचविण्यात डॉक्टरांना यश आले नाही. सध्या कंपनी या घटनेचा तपास करीत आहे.