३१ जानेवारीपर्यंत सत्ता सोडा, अन्यथा..., इम्रान खान यांना अल्टिमेटम
By बाळकृष्ण परब | Published: January 5, 2021 05:01 PM2021-01-05T17:01:02+5:302021-01-05T17:04:09+5:30
Imran Khan News : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची कन्या आणि पीएमएल एन च्या नेत्या मरियम नवाझ यांनी इम्रान खान यांना अल्टिमेटम दिले आहे.
इस्लामाबाद - पाकिस्तानमध्येइम्रान खान यांच्याविरोधात सुरू असलेला राजकीय विरोध दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत आहे. दरम्यान, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची कन्या आणि पीएमएल एन च्या नेत्या मरियम नवाझ यांनी इम्रान खान यांना अल्टिमेटम दिले आहे. जर इम्रान खान यांनी ३१ जानेवारीपर्यंत सन्मानाने सत्ता सोडली नाही तर अन्य निर्णय घेतला जाईल. तसेच पीडीएमच्या नेतृत्वात एक लाँग मार्च काढला जाईल, असा इशारा मरियम नवाझ यांनी दिला आहे.
मरियम नवाझ म्हणाल्या की, इम्रान खान यांनी ३१ जानेवारीपर्यंत राजीनामा दिला नाही तर विरोधी पक्षातील खासदार राजीनामा देतील. एवढेच नाही तर अन्य निर्णयही घेतले जातील. दुसरीकडे इम्रान खान यांनी आप्ला सरकारला ११ पक्षांची आघाडी असलेल्या पीडीएमपासून कुठलाही धोका नाही. सोमवारी आपल्या प्रवक्त्यांच्या बैठकीला संबोधित करताना इम्रान खान म्हणाले की, पीडीएम जवळपास हरवला आहे आणि आपोआप मरण पावला आहे. त्यामुळे त्याच्यापासून सरकारला कुठलाही धोका नाही.
इम्रान खान म्हणाले की, पाकिस्तान डेमोक्रॅटिक मुव्हमेंटचा मुख्य अजेंडा हा आपल्या नेत्यांसाठी नॅशनल रिकंसिलिएशन ऑर्डिनन्ससारख्या सवलती घेण्याचा होता. त्यांनी सांगितले की, पीडीएमच्या पूर्ण आंदोलनाचा हेतू हा एनआरओ मिळवण्याचा आहे. मात्र मी त्यां कुठलाही दिलासा देणार नाही.
द एक्स्प्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार खान यांनी सांगितले की, कोरोना विषाणूच्या साथीमुळे देण्यात आलेल्या इशाऱ्यानंतरही विरोधी आघाडी सभा घेत आहे आणि लोकांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान विरोधी पीडीएम आघाडीचे नेते आणि इम्रान खान यांच्यातील आरोप प्रत्यारोपामुळे पाकिस्तानमधील राजकीय वातावरण तापत आहे.