हा रुसवा सोड... पुरे हा अबोला!
By admin | Published: January 4, 2017 02:33 AM2017-01-04T02:33:29+5:302017-01-04T02:33:29+5:30
नवरा आणि बायकोचं भांडण तसं भारतीयांना नवीन नाही. भारतातच नव्हे, जगभर नवरा-बायकोची भांडणं होतच असताना. पण आदळआपट करून नवरा - बायको रुसवा सोडून
टोकियो : नवरा आणि बायकोचं भांडण तसं भारतीयांना नवीन नाही. भारतातच नव्हे, जगभर नवरा-बायकोची भांडणं होतच असताना. पण आदळआपट करून नवरा - बायको रुसवा सोडून पुन्हा एकत्र येतात. जगाच्या पाठीवर नवरा - बायकोतील नातं सारखंच आहे, याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे. तब्बल वीस वर्षे बायकोशी रुसवा करणाऱ्या जपानमधील या पती महाशयांनी अखेर आपला राग सोडला आणि कुटुंबातील मुलाबाळांना आनंदाचा नवा क्षण गवसला.
ओटोयू यांचे तसं सुखी कुटुंब आहे. पत्नी, तीन मुलांसह ते गुण्यागोविंदाने राहतात. पण, माशी कुठे तरी शिंकली अन् यांचा पारा वाढला. त्यांचा १८ वर्षांचा मुलगा योशिकी याने एका टीव्ही शोमध्ये ही खंत बोलून दाखविली आणि आपल्या आई - वडिलांना ‘बोलतं’ करण्यासाठी मदतही मागितली. आम्हाला जेव्हापासून कळू लागलं, तेव्हापासून, आम्ही वडिलांना आणि आईला बोलताना बघितलेलंच नाही, असं योशिकी आणि त्याच्या दोन बहिणींनी सांगितलं.
बरं, बायकोबद्दल एवढा राग का? तर, म्हणे मुलांच्या जन्मानंतर ती सतत मुलांच्या संगोपनातच व्यस्त असायची. या दाम्पत्याला बोलते करण्यासाठी एका पार्कमध्ये काही नागरिकांनी त्यांची भेट घडवून आणली. याच पार्कमध्ये ते प्रथम भेटले होते. एका बेंचवर हे दाम्पत्य बसलं आणि ओटोयू यांनी आपल्या शब्दांना वाट करुन दिली अन् २० वर्षांचा रुसवा क्षणात दूर झाला.