आम्हाला मोकळे सोडा, मग भारताला दाखवतो, मसुद अझरने ओकली गरळ
By admin | Published: October 13, 2016 11:23 AM2016-10-13T11:23:24+5:302016-10-13T11:43:03+5:30
भारताविरोधात दहशतवादी कारवाया करण्यासाठी काश्मीरमध्ये दहशतवादी समुह वाढण्यात यावेत, यासाठी पाकिस्तानच्या सरकारने हिम्मत दाखवावी, असे सांगत त्याने पाकिस्तानी सरकारलाच चुचकारले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - कुख्यात दहशतवादी आणि जैश-ए- मोहम्मदचा प्रमुख मसूद अझरने पुन्हा भारताविरोधात गरळ ओकली आहे. भारताविरोधात दहशतवादी कारवाया करण्यासाठी काश्मीरमध्ये जिहादी समुह वाढण्यात यावेत, यासाठी पाकिस्तानच्या सरकारने हिम्मत दाखवावी, असे सांगत त्याने पाकिस्तानी सरकारलाच चुचकारले आहे. जैश-ए-मोहम्मदचे मॅगझिन अल-कलामद्वारे अझरने ही गरळ ओकली आहे. निर्णायक निर्णय घेण्यात होत असलेल्या दिरंगाईमुळे पाकिस्तान काश्मीरमधील ऐतिहासिक संधी गमावू शकतो, असेही त्याने म्हटले आहे. मसूद अझरच्या या मागणीमुळे भारत आणि पाकिस्तानातील संबंध आणखी ताणण्याची शक्यता आहे.
काश्मीरमधील दहशतवादी हालचाली वाढवण्यासाठी पाकिस्तान सरकारने थोडेशी जरी हिम्मत दाखवली, तरी काश्मीरमधील समस्या, येथील पाण्यासंदर्भातील वाद संपुष्टात येतील, हे जमत नसेल तर, सरकारने जिहादींचे मार्ग मोकळे करावेत, अशी थेट मागणी त्याने मॅगझिनद्वारे केली आहे. असे झाल्यास 1971मधील कटू आठवणी या वर्षातील विजयामुळे पुसल्या जातील, असेही म्हणत अझरने विष पेरण्याचे काम केले आहे. अखंड भारत हे भारताचे स्वप्न आहे, मात्र जिहादी समुहांनी त्यांचे अंग-अंग जखमी केल्यामुळे अखंड भारताची त्यांची आशा अपूर्ण राहिली आहे. तसेच, पठाणकोट आणि उरी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराची क्षमता किती आहे, हे उघड झाल्याचे देखील त्याने म्हटले आहे. दरम्यान,1990 पासून चालत आलेल्या जिहादी नीतीमुळे पाकिस्तानला फायदा झाल्याचा दावाही त्याने केला आहे.
उरी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानावर दबाव निर्माण करत आहे. मात्र काश्मीममधील परिस्थिती पाहिली असता, पाकिस्तानने भारतावर दबाव टाकायला हवा होता, असेही त्याने पाकिस्तानी सरकारला डिवचण्याचे काम केले आहे. काश्मीर हा आपल्यासाठी जीवन मरणाचा मुद्दा असून, सार्क परिषद आणि नियंत्रण रेषेवरील शस्त्रसंधी आपण रद्द करायला हवी होती. काश्मीरमधील जिहाद आधीचा आणि नंतरच्या भारताबाबत विचार करा, तुम्हाला यात मोठा फरक जाणवेल. काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यामुळे भारतीय लष्कराला धक्का बसला आहे, असा कांगावाही त्याने केला आहे, असा पोकळ दावाही त्याने केला आहे.
दरम्यान, भारताकडून पाकिस्तानातील दहशतवादी समुहांविरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे. मात्र दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यावरुन पाकिस्तानचे सरकार आणि त्यांच्या लष्करातच मतभेद असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी डॉनचे पत्रकार सायरिल अलमिडा यांनी छापली होती. याप्रकरणी त्यांच्यावर देशाबाहेर जाण्यासाठी बंदीही घालण्यात आली.