इस्त्रायलच्या हल्ल्यात लेबनानच्या सैनिकाचा मृत्यू; व्यक्त केला खेद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 05:30 PM2023-12-06T17:30:32+5:302023-12-06T17:31:03+5:30
इस्त्रायल आणि लेबनानच्या सीमेवर छोट्या मोठ्या चकमकी सुरु झाल्या आहेत. इस्त्रायल हमासला मदत करणाऱ्या हिजबुल्लाहवर हल्ले करत आहे जे लेबनानच्या सीमेत आहेत.
इस्त्रायलच्या हल्ल्यात लेबनानच्या सैनिकाचा मृत्यू झाला आहे. तर तीन सैनिक जखमी झाले आहेत. यावर इस्त्रायलने खेद व्यक्त केला असून याची चौकशी केली जाणार असल्याचे म्हटले आहे. इस्रायलने हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेच्या तळावर हल्ला केला होता, परंतू तिथे लेबनानचे सैनिक होते, असे इस्त्रायलने म्हटले आहे.
इस्त्रायल आणि लेबनानच्या सीमेवर छोट्या मोठ्या चकमकी सुरु झाल्या आहेत. इस्त्रायल हमासला मदत करणाऱ्या हिजबुल्लाहवर हल्ले करत आहे जे लेबनानच्या सीमेत आहेत. लेबनानच्या सैन्याने म्हटले आहे की, इस्रायलद्वारे केलेल्या बॉम्बफेकीत आपला एक सैनिक शहीद झाला आहे. तर अन्य तीन जखमी झाले आहेत. यावर इस्त्रायलने देखील व्यक्त होत या घटनेवर खेद व्यक्त केला आहे.
हिजबुल्लाह कॅम्प म्हणून ओळख पटविलेल्या जागेवर आमच्या सैनिकांनी गोळीबार केला. यामध्ये काही लेबनान सैनिक जखमी झाल्याचे समजते आहे. आमचे लक्ष्य लेबनीज सैनिक नव्हते, आम्हाला याचा खेद वाटतोय, असे इस्रायलने म्हटले आहे.
हिजबुल्लाहने हमासच्या हल्ल्याचे समर्थन केले होते. हिजबुल्लाचा नेता हसन नसरल्लाहने 7 ऑक्टोबरच्या घटनेत आपल्या संघटनेची कोणतीही भूमिका नसल्याचे म्हटले होते. यानंतर उत्तर सीमेवर लेबनॉन आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष तीव्र झाला होता. इस्रायलने सीमाभागातील आपल्या नागरिकांनाही सुरक्षित स्थळी हलविले आहे.