लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 12:47 PM2024-09-29T12:47:07+5:302024-09-29T12:47:26+5:30
इस्रायलची विमाने कधी येतील आणि बॉम्ब टाकून जातील याची शाश्वती नसल्याने लेबनॉनी नागरिकांनी रात्र रस्त्यावर काढली आहे.
इस्रायलने हिजबुल्लाहच्या म्होरक्याला मारण्यासाठी थेट लेबनॉनची राजधानी बैरुतवरच हल्ले केले आहेत. दहशतवाद्यांना आपली भूमी वापरू देण्याची शिक्षा आता लेबनॉनी लोकांना भोगावी लागत आहे. हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्लाह मारला गेला तरी देखील इस्रायलने लेबनॉनवर हल्ले सुरुच ठेवल्याने तेथील नागरिक हादरले आहेत.
लेबनॉनचे सैन्य आणि सरकार इस्रायलला प्रतिकार करायचे सोडून गायब झाले असल्याचे आरोप कर हे लोक आपला देश सोडू लागले आहेत. लेबनॉनी लोक शनिवारी रात्रीपासून सिरियाच्या वाटेवर निघाले आहेत. इस्रायलच्या हल्ल्यांना घाबरून हे लोक पलायन करत आहेत.
एकतर युद्ध भडकेल किंवा इस्रायल गाझा पट्टीप्रमाणेच शहरेच्या शहरे उध्वस्त करेल या भीतीने हे लोक पळून जात आहेत. सुमारे २० किमीवर सिरियाची हद्द आहे. तिकडे हे लोक चालत जाऊ लागले आहेत. लेबनॉनने पाच दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. सर्व दुकाने, सरकारी-खासगी कार्यालये २ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
आता लेबनॉन इस्रायलवर प्रतिकार करतो की आपल्या कर्माची फळे भोगतो, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे. लेबनॉनमधील दक्षिणी भागातील लोक देशाच्या अन्य सुरक्षित वाटणाऱ्या भागात स्थलांतर करत आहेत. अशातच इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी आम्ही कोणत्याही भागात केव्हाही पोहोचू शकतो, असा इशारा दिल्याने लेबनॉनी लोकांनी आता सिरियाकडे जाण्याचा मार्ग पत्करला आहे.
इस्रायलची विमाने कधी येतील आणि बॉम्ब टाकून जातील याची शाश्वती नसल्याने लेबनॉनी नागरिकांनी रात्र रस्त्यावर काढली आहे. हिजबुल्लाने आपली शस्त्रे निवासी इमारतींमध्ये लपवून ठेवल्याचा आरोप इस्रायलने केला आहे. यामुळे आपल्या इमारतीवर केव्हाही बॉम्ब, मिसाईल पडू शकते अशी भीती या नागरिकांना वाटू लागली आहे. बैरुतमधील अशीच एक बहुमजली इमारत इस्रायली हवाई दलाने केलेल्या भीषण बॉम्बस्फोटात जमीनदोस्त झाली आहे. या इमारतीच्या तळघरात या इमारतीत हिजबुल्लाह प्रमुख हसन नसराल्लाह आणि संघटनेचे इतर प्रमुख कमांडर उपस्थित असल्याचा दावा इस्रायलने केला होता. तो खरा ठरला आहे.