कोहिनूर हि-यासाठी भारतीयांची महाराणीविरोधात कायदेशीर लढाई
By Admin | Published: November 9, 2015 02:11 PM2015-11-09T14:11:12+5:302015-11-09T14:11:12+5:30
अमूल्य कोहिनूर हिरा परत भारतात यावा यासाठी ब्रिटनमधील भारतीय उद्योजक आणि अभिनेत्यांनी ब्रिटनच्या महाराणीविरोधात कायदेशीर लढाई सुरु करण्याची तयारी केली आहे.
>ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. ९ - अमूल्य कोहिनूर हिरा परत भारतात यावा यासाठी ब्रिटनमधील भारतीय उद्योजक आणि अभिनेत्यांनी ब्रिटनच्या महाराणीविरोधात कायदेशीर लढाई सुरु करण्याची तयारी केली आहे. या कायदेशीर लढ्यासाठी डेव्हिड डिसूझा हे भारतीय वंशांचे उद्योजक आर्थिक पाठबळ देणार आहेत.
८०० वर्षांपूर्वी भारतातील खाणीत आढळलेला कोहिनूर हिरा १०५ कॅरेटचा असून इंग्रजांच्या कार्यकाळात महाराणी व्हिक्टोरिया यांना हा हिरा भेट म्हणून देण्यात आला होता. हा हिरा महाराणी एलिझाबेथ यांच्या आईच्या मुकुटात बसवण्यात आला असून सध्या टॉवर ऑफ लंडनमधील प्रदर्शनात हा हिरा ठेवण्यात आला आहे.
भारतातून संशयास्पदरित्या हा हिरा ब्रिटनमध्ये नेण्यात आला. हा हिरा भारतातील अमूल्यवान ठेवा असून इंग्रजांनी भारतीयांची आर्थिक लूट केलीच पण त्यासोबत भारतीयांचा आत्माही दुखावला अशी प्रतिक्रिया टिटोज या समुहाचे सहसंस्थापक डेव्हिड डिसूझा यांनी दिली आहे. हा हिरा परत यावा यासाठी डिसूझा व त्यांच्या सहका-यांनी वकिलांना ब्रिटनमधील उच्च न्यायालयातील सुनावणी सुरु करण्याची विनंतीही केली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटन दौ-यावर येत असतानाच पुन्हा एकदा कोहिनूर हि-याचा वाद सुरु झाला आहे. कोहिनूर हिरा ब्रिटनचाच असल्याचा दावा ब्रिटनने नेहमीच केला आहे.