चीनमध्ये अचनाक लिंबूच्या विक्रीत मोठी वाढ; नागरिकांची रांग, नेमकं कारण काय?, पाहा!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 06:03 PM2022-12-21T18:03:40+5:302022-12-21T18:05:02+5:30
कोरोना महामारीची सुरुवात ज्या देशात झाली, त्या चीनमध्ये या महामारीने पुन्हा थैमान घातला आहे.
कोरोना महामारीची सुरुवात ज्या देशात झाली, त्या चीनमध्ये या महामारीने पुन्हा थैमान घातला आहे. चीनमधील परिस्थिती इतकी भीषण झाली आहे की, रुग्णांना ठेवण्यासाठी बेड नाहीत, मृतांना जाळण्यासाठी जागाही मिळेना. 24 तास अंत्यविधीसाठी वाट पाहावी लागत आहे.
सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार, चीनमध्ये कोरोना आटोक्यात आहे. चीनमध्ये बुधवारी कोरोनाचे नवीन 3101 प्रकरणांची नोंद झाली. यासोबतच चीनमध्ये रुग्णांची एकूण संख्या 386,276 झाली आहे. सरकारचे म्हणणे आहे की, चीनमध्ये आता फक्त श्वसनासंबंधी आजार झाला, तरच कोरोना मृतांमध्ये नोंद होणार. या नियमानुसार, 20 डिसेंबर रोजी चीनमध्ये कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झाला आहे.
चीनने देशव्यापी आंदोलनानंतर या महिन्यात झिरो कोव्हिड पॉलिसी हटवली होती. कडक नियम शिथिल करताच देशातील लाखो लोकांना कोरोनाची लागण झाली. मिळालेल्या माहितीनुसार, ज्यांना कोरोना झाला आहे, त्यांनी कोरोना व्हॅक्सीन घेतलेली नाही. यात वृद्धांची संख्या जास्त आहे. कोरोनाच्या या लाटेसाठी हॉस्पिटल तयार नव्हते, त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली.
चीनमध्ये कोरोना आणि सर्दीवरील औषधांच्या तुटवड्यामुळे लोक नैसर्गिकरित्या प्रतिकारशक्ती वाढवण्याचा आग्रह धरत आहेत. त्यामुळे बाजारात लिंबूंची विक्री अचानक वाढली आहे. तथापि, लिंबाच्या सेवनाने थेट कोरोना संसर्गापासून संरक्षण मिळते याची शास्त्रीयदृष्ट्या अद्याप पुष्टी झालेली नाही. मात्र नागरिक मोठ्या प्रमाणात लिंबूची खरेदी करत आहेत.
लिंबूच्या विक्रीत मोठी वाढ-
चीनच्या नैऋत्य भागातील सिचुआन प्रांतातील लिंबू शेतकरी वेन यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून लिंबूची विक्री खूप वाढली आहे. त्यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात त्यांनी दररोज सुमारे 20 ते 30 टन लिंबू विकले, तर पूर्वी ते फक्त 5 ते 6 टन लिंबू विकू शकत होते. वेन सुमारे 130 एकरवर लिंबू उत्पादन करतात.
लिंबूचे काय फायदे आहेत?
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते आणि व्हिटॅमिन सीमध्ये आढळणारे शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट रोगप्रतिकारक शक्तीसाठी तसेच संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. जर आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती चांगली असेल तर कोरोना संसर्गाशी लढण्यासही मदत होईल. व्हिटॅमिन सी चांगली प्रतिकारशक्ती देण्यासोबतच हृदयविकारांपासूनही संरक्षण करते.