येतो सांगून येत नाहीत, असं कसं? 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 07:45 AM2023-03-06T07:45:37+5:302023-03-06T07:46:26+5:30

लग्न हा बहुतेक सगळ्या लोकांच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. त्या दिवशीच्या कार्यक्रमाची तयारी लोक अनेक महिने आधीपासून करत असतात.

Less than half my wedding guests turned up we sat in the empty ceremony and cried tiktok video | येतो सांगून येत नाहीत, असं कसं? 

येतो सांगून येत नाहीत, असं कसं? 

googlenewsNext

लग्न हा बहुतेक सगळ्या लोकांच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. त्या दिवशीच्या कार्यक्रमाची तयारी लोक अनेक महिने आधीपासून करत असतात. त्या दिवशी घालण्याचे कपडे, जेवणाचा मेन्यू, ठिकाण, फोटोशूट या प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग त्या होऊ घातलेल्या जोडप्याने केलेलं असतं. त्यावेळी करण्याचं फोटोशूट, दागिने, लोकांना देण्याचा अहेर या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये स्वप्नं रंगवलेली असतात. लग्न जरी दोन माणसं करत असली आणि त्यामुळे जरी दोन कुटुंबे एकत्र येणार असली तरी त्या आनंदाच्या क्षणांमध्ये आपल्या जवळच्या मित्र आणि नातेवाइकांनी सहभागी व्हावं असं बहुतेक सगळ्यांनाच वाटत असतं. त्यामुळेच लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांची यादी हा लग्नाच्या तयारीतील फार मोठा भाग असतो. याद्या करताना कोणी चुकून राहून जायला नको यासाठी दहा वेळा डोळ्यात तेल घालून याद्या तपासल्या जातात.

हा सगळा भाग बहुतेक सगळ्या देशांमधल्या संस्कृतीमध्ये सारखाच असतो. येणाऱ्या पाहुण्यांची संख्या तेवढी कमी जास्त होत असते. भारतासारख्या देशात हजार-दोन हजार माणसांची पंगत उठणं सर्वसामान्य समजलं जातं, पण अमेरिकेसारख्या देशात शंभर लोकांना लग्नाला बोलावणं हीही अनेकदा मोठी गोष्ट समजली जाते. त्यातील अजून एक भाग म्हणजे अमेरिकेत बहुतेक वेळा लग्न करणारं जोडपं त्या लग्नाचा संपूर्ण खर्च स्वतः करतं. म्हणजे त्या तरुण मुलांनी तोवर केलेल्या कामातून कमावलेले पैसे ते स्वतःच्या लग्नावर खर्च करत असतात. अशा वेळी जर का एकूण निमंत्रित पाहुण्यांपैकी अर्धे पाहुणे आलेच नाहीत तर? 

ग्रे नरव्हेज ड्रॅगिअन आणि निक्स या तरुण जोडप्याच्या बाबतीत दुर्दैवाने असंच काहीसं झालं. त्यांनी त्यांच्या लग्नसमारंभासाठी ज्या लोकांना आमंत्रण केलं होतं त्यापैकी ८८ लोकांनी नक्की येणार असं कळवलं होतं.  प्रत्यक्षात मात्र त्यापैकी ४० जणसुद्धा आले नाहीत.

ग्रे आणि निक्स पाहुण्यांची वाट बघत राहिले, पण अजून कोणी येण्याची शक्यता दिसत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी लग्नसमारंभ सुरू केला. एकूण संख्या कमी असल्यामुळे त्यांना आधी ठरवलेले काही कार्यक्रम रद्द करावे लागले. उदाहरणार्थ, त्यांनी त्यांच्या लग्नानंतर डीजे आणि नृत्याची व्यवस्था केली होती. मात्र कमी संख्येमुळे त्यांना ते रद्द करावं लागलं. त्याशिवाय काही लोकदेखील लग्नसमारंभातून लवकर निघून गेले. ग्रे म्हणते, “आम्ही लग्नाच्या कागदपत्रांवर सह्या करत होतो, त्यावेळी काही लोक निघून जात होते!..”

त्या दोघांचं म्हणणं आहे, जे लोक येतो असं कळवूनदेखील आले नाहीत ते बहुतेक सगळे आमचे सहकारी होते. त्यांच्यापैकी एकाने तर सकाळी मेसेज करून या लग्नसमारंभात सहभागी होण्याची ते कशी वाट बघतायत वगैरे कळवलं होतं. मात्र तीही व्यक्ती लग्नाला आली नाही. 

या सगळ्या प्रकाराने रडवेल्या झालेल्या ग्रेने एक टिकटॉक व्हिडीओ बनवून तो इंटरनेटवर टाकला आणि बघता बघता तो व्हिडीओ व्हायरल झाला. अक्षरशः लाखो लोकांनी तो बघितला. हा व्हिडीओ बघणाऱ्या लोकांनी त्याखाली कॉमेंट्स करून या जोडप्याला सहानुभूती दाखवली. येतो असं कळवूनदेखील गैरहजर राहिलेल्या त्यांच्या पाहुण्यांबद्दल नेटकऱ्यांनी भरपूर राग व्यक्त केला. एकाने लिहिलं, “माझ्या बाबतीत असं झालं असतं तर त्या न आलेल्या लोकांशी मी पुन्हा कधीच बोललो नसतो.” दुसऱ्या एकीने या जोडप्याला सांगितलं, “जे नाही आले त्यांचा विचार करून दुःखी होऊ नका. हा व्हिडीओ बघणारे जगभरातले अनेक लोक तुमच्या आनंदात सहभागी आहेत.” अनेक लोकांनी त्या दोघांना लग्नाला आणि भावी सहजीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

१८ वर्षांची ग्रे म्हणते, “सुरुवातीला इतके कमी लोक आपल्या लग्नाला आलेले बघून मला फारच त्रास झाला. पण मग हळूहळू माझ्या लक्षात आलं, जे लोक आले होते ते मात्र खूप प्रेमाने आले होते आणि त्यांनी आमचा छोटेखानी कार्यक्रम खूप एन्जॉय केला. आता मला असं वाटतं आहे की, एकूण आमच्या लग्नाची पार्टी छान झाली. त्यासाठी आलेल्या लोकांची मी आभारी आहे!” 

अडीच लाख रुपयांचा फटका!
ग्रे आणि निक्सच्या लग्नाला ऐनवेळी कमी पाहुणे आल्यामुळे त्यांना एकूण २५०० ते ३००० डॉलर्सचा (सुमारे दोन ते अडीच लाख रुपये) फटका बसला. त्यांच्याकडे खूप सारं जेवण उरलं आणि वेडिंग केकचा मोठा भागही शिल्लक राहिला. त्याशिवाय लोकांसाठी सीलेक्ट करून आणलेल्या भेटवस्तूही तशाच राहून गेल्या. पैसे वाया जाण्याबरोबरच या वस्तूंकडे बघून त्या दोघांना आता जास्त वाईट वाटतं आहे.

Web Title: Less than half my wedding guests turned up we sat in the empty ceremony and cried tiktok video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.