भारताला पाठिंबा देणाऱ्या देशांवर क्षेपणास्त्रांचा थेट हल्ला करू; पाकिस्तानची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 02:53 AM2019-10-31T02:53:31+5:302019-10-31T06:23:01+5:30
पाकिस्तानचे मंत्री अली अमीन यांची विखारी धमकी
इस्लामाबाद : काश्मीरच्या प्रश्नावर जो देश भारताची बाजू घेईल तो पाकिस्तानचा शत्रू असेल व अशा देशावर पाकिस्तान क्षेपणास्त्राने हल्ला करील, अशी विखारी धमकी पाकिस्तानच्या एका मंत्र्याने केली आहे.
पाकिस्तानचे काश्मीर व गिलगिट-बाल्टिस्तान बाबींचे मंत्री अली अमीन गंडापूर मंगळवारी येथे एका कार्यक्रमात म्हणाले की, काश्मीरच्या प्रश्नावर तणाव आणखी वाढत गेला तर पाकिस्तानला नाइलाजाने युद्ध पुराकावे लागेल. त्यामुळे असे युद्ध जेव्हा होईल तेव्हा भारताला पाठिंबा देशांनाही पाकिस्तानचे शत्रू मानले जाईल व भारतासोबत अशा देशांवरही क्षेपणास्त्रांनी हल्ला केला जाईल. पाकिस्तानमधील एक पत्रकार नायला इनायत यांनी मंत्री गंडापूर यांच्या या प्रक्षोभक भाषणाचा व्हिडिओ टिष्ट्वटरवर प्रसारित केला आहे.
भारताने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यापासून पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. पाकिस्तानने त्यानंतर भारतासोबतचे राजनैतिक संबंध कनिष्ठ पातळीवर आणले व संधी मिळेल तेव्हा प्रत्येक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारतावर बेछूट आरोप केले. पण बहुतेक सर्वच देशांनी काश्मीरच्या प्रश्नावर भारताचीच बाजू घेतली आहे. मंत्री गंडापूर यांचे आताची ही वल्गना त्यांचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत केलेल्या भाषणाचीच री ओढणारी आहे.
संयुक्त राष्ट्रांतील संपूर्ण ५० मिनिटांचे भाषण इम्रान खान यांनी काश्मीरवरून भारतावर आगपाखड करण्यात खर्ची घातले होते. काश्मीरवरून भारताशी कदाचित अणुयुद्धालाही तोंड लागू शकेल, असा गर्भित इशारा देत इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांना, ‘चांगलीची आशा करा, पण वाईटात वाईटाचीही तयारी ठेवा’, असे सांगितले होते. (वृत्तसंस्था)
शरणागती वा सोक्षमोक्ष
इम्रान खान म्हणाले होते, ‘युद्धाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने झाली तरी अण्वस्त्रधारी देश जेव्हा प्राणपणाने लढतो तेव्हा त्या युद्धाचे परिणाम त्या देशांच्या सीमांपुरते मर्यादित राहत नाहीत. आपल्याहून सातपट मोठ्या देशाशी लढताना छोटा देश काय करील? एक तर शरणागती पत्करेल किंवा सोक्षमोक्ष लावण्यासाठी लढेल.