इस्लामिक स्टेटचा नायनाट करू - ओलांद
By admin | Published: November 18, 2015 03:41 AM2015-11-18T03:41:05+5:302015-11-18T03:41:05+5:30
पॅरिसचे अध्यक्ष फ्रँकॉईस ओलांद यांनी इस्लामिक स्टेटला नष्ट करण्याचा निर्धार केला असून देशात दहशतवादविरोधात नवे कठोर उपाय योजण्याचे आश्वासन दिले.
पॅरिस : पॅरिसचे अध्यक्ष फ्रँकॉईस ओलांद यांनी इस्लामिक स्टेटला नष्ट करण्याचा निर्धार केला असून देशात दहशतवादविरोधात नवे कठोर उपाय योजण्याचे आश्वासन दिले. त्याचवेळी सिरियामध्ये बॉम्बहल्ले आणखी वाढवणार असल्याचे सांगितले.
व्हर्सेलीस येथे संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या विशेष बैठकीत ते मंगळवारी बोलत होते. फ्रान्स आणि बेल्जियमने आठ जिहादींच्या शोधासाठी सोमवारी संशयित दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर कित्येक डझन छापे घातले. या ठिकाणांमध्ये ब्रुसेल्समधील मूलतत्त्ववादी ठिकाणाचाही समावेश आहे. या ठिकाणी हल्लेखोरांपैकी काही जण राहत असल्याचा संशय आहे.
१२९ जणांचा प्राण घेणाऱ्या व ३५० पेक्षा जास्त जण जखमी करणाऱ्या पॅरिस हल्ल्यांचे वर्णन ओलांद यांनी ‘युद्धाचे कृत्य’ असे केले. आयएसला नष्ट करण्याच्या नव्या आक्रमणाचा भाग म्हणून आम्ही अमेरिका आणि रशियाशीदेखील चर्चा करीत आहोत, असे त्यांनी म्हटले. ओलांद म्हणाले, १३ नोव्हेंबरच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा कट हा सिरियामध्ये ठरला व तयार केला गेला. त्याला अंतिम रूप बेल्जियममध्ये दिले गेले व फ्रान्समधील काही जणांच्या मदतीने आमच्या भूमीवर त्याची अंमलबजावणी केली गेली.
आयएसला नष्ट करण्याची काळजी संपूर्ण जगाला असली पाहिजे. सिरियामध्ये आयएसविरोधात करावयाच्या कारवाईची आमची क्षमता तीनपट करण्यासाठी पूर्व भूमध्यसागरात ‘चार्ल्स द गॉल’ ही विमानवाहू नौका तैनात केली जात असल्याचे ते म्हणाले. येत्या आठवड्यांत हल्ले चालूच राहतील. त्यात खंड पडणार नाही आणि युद्धबंदीही होणार नाही, असे ओलांद यांनी स्पष्ट केले.
देशामध्ये आणीबाणीची मुदत त्यांनी आणखी तीन महिन्यांनी वाढविली. दहशतवादविरोधाला मदत म्हणून त्यांनी पोलीस आणि न्यायालयीन पातळीवर ८,५०० नवे रोजगार जाहीर केले.