शत्रूला असा धडा शिकवू...! नेतन्याहूंचे हवाई दल, लष्कराला गाझा पट्टीच उध्वस्त करण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 03:33 PM2023-10-07T15:33:29+5:302023-10-07T15:33:41+5:30
पाच इस्रायली सैनिकांचे अपहरण करण्यात आले आहे. या हल्ल्यांमध्ये सुमारे 5 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
इस्रायलने फिलिस्तीनींना धडा शिकविण्याचा निर्णय घेतला आहे. हमासने आज केलेल्या भीषण हल्ल्यामध्ये इस्रायलचे अनेक नागरिक जखमी झाले आहेत, मृत झाले आहेत. यामुळे इस्रायलने हवाई दलाला लढाऊ विमाने घेऊन गाझावर हल्ल्या करण्याचे आदेश दिले आहेत. इस्रायलच्या सैन्याने हमासविरोधात 'ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड्स' सुरु केले आहे. डझनभर लढाऊ विमाने गाझा पट्टीतील दहशतवाद्यांच्या तळावर बॉम्बफेक करत आहेत.
या दरम्यान पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मोठे वक्तव्य केले आहे. आम्ही युद्धात उतरलो आहोत. हे कोणतेही ऑपरेशन नाहीय. हमासने इस्रायलचे नागरिक आणि देशाविरोधात जिवघेणा हल्ला केला आहे. मी सर्वात आधी घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांच्या वस्त्या संपविण्याचे आदेश देले आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमविण्यास सांगितले आहे. आता दुश्मनाला अशी किंमत चुकवावी लागणार आहे, ज्याबाबत त्याने विचारही केला नसेल, असा इशारा नेतन्याहू यांनी दिला आहे.
शनिवारी सकाळी पॅलेस्टिनी शस्त्र समूह हमासने गाझा पट्टीतून जोरदार रॉकेट हल्ले केले. मासने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली असून याला इस्रायलविरोधातील लष्करी कारवाई म्हटले आहे. हमासने सुमारे 20 मिनिटांत गाझा पट्टीतून 5,000 रॉकेट डागले. एवढेच नाही तर त्यांनी इस्रायलमध्ये घुसखोरी करून काही लष्करी वाहने ताब्यात घेतली. याशिवाय पाच इस्रायली सैनिकांचे अपहरण करण्यात आले आहे. या हल्ल्यांमध्ये सुमारे 5 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
इस्रायलचे भारतातील राजदूत नॉर गिलॉन यांनीही ट्विट केले आहे. पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी दुतर्फा हल्ला केला आहे. जमीन आणि आकाश अशा दोन्ही बाजूंनी हल्ले झाले आहेत. ज्यूंच्या सुट्टीच्या काळात गाझामधून इस्रायलवर संयुक्त हल्ला होतो. हमासच्या दहशतवाद्यांकडून रॉकेट आणि जमिनीवर घुसखोरी करण्यात आली आहे. हा सामान्य हल्ला नाहीय, इस्रायल नक्कीच जिंकेल असे गिलॉन यांनी म्हटले आहे.