पत्र पोहोचण्यास लागली अवघी 50 वर्षे !
By admin | Published: October 24, 2016 06:11 PM2016-10-24T18:11:33+5:302016-10-24T18:11:33+5:30
ऑस्ट्रेलियन पोस्ट खात्याने एक पत्र थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल 50 उशिराने पोहोचवण्याचा पराक्रम केला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि. 24, - पोस्टातून पाठवलेले पत्र वेळेत न पोहोचणे, टपाल गहाळ होणे अशा गोष्टी भारतीयांसाठी सवयीच्या झालेल्या आहेत. पण अशी दिरंगाई, भोंगळपणा केवळ भारतातच होतो असे समजायचे कारण नाही. ऑस्ट्रेलियन पोस्ट खात्याने एक पत्र थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल 50 उशिराने पोहोचवण्याचा पराक्रम केला आहे. त्यानंतर या दिरंगाईसाठी ऑस्ट्रेलियाच्या पोस्ट खात्याने रविवारी माफीही मागितली आहे.
अॅडलेड येथे राहणाऱ्या एका दाम्पत्याला फ्रेंच पॉलिनेशियातील बेट असलेल्या ताहिती येथून आलेले एक जुनाट पोस्ट कार्ड मिळाले. या पोस्ट कार्डवर पोस्टाचा 1966 सालचा शिक्का असून, हे पत्र ख्रिस नावाच्या व्यक्तीने रॉबर्ट जॉर्जिओला पाठवले होते. दरम्यान, हे पत्र मिळालेले टीम डफी म्हणतात, "हे पत्र या घराच्या जुन्या मालकाला पाठवण्यात आले असावे. हे पत्र इटालियन व्यक्तीने 1963 लिहिले असावे. तसेच या पत्रावर मला 1966 ची तारीख आढळली आहे. तसेच हे पत्र पाठवणारा बोटने प्रवास करत असावा."
डफी आणि त्यांची पत्नी 18 महिन्यांपूर्वी अॅडलेडमधील घरात राहायला आले होते. त्या घराच्या पत्त्यावर हे पत्र आले आहे. दरम्यान, डफी यांनी हे पत्र ऑस्ट्रेलियन पोस्ट खात्याला परत केले असून, झालेल्या चुकीबद्दल ऑस्ट्रेलियन पोस्टखात्याने माफी मागितली आहे. "काही तरी गंभीर चुकीमुळे फ्रेंच पॉलिनेशियातून पाठवण्यात आलेले पत्र पत्त्यावर पोहोचण्यास 50 वर्षे लागली. ग्राहकांना झालेल्या त्रासासाठी आम्ही माफी मागतो,"असे ऑस्ट्रेलियन पोस्ट खात्याच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.