कॅनडामध्ये लिबरल पक्षाचा दणदणीत विजय
By admin | Published: October 21, 2015 04:22 AM2015-10-21T04:22:05+5:302015-10-21T04:22:05+5:30
गेली दहा वर्षे सत्तेमध्ये असणाऱ्या कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला धक्का देत जस्टीन ट्रुडेऊ यांच्या नेतृत्वाखाली लिबरल पक्षाने विजय मिळविला आहे. ४३ वर्षीय जस्टीन ट्रुडेऊ हे माजी
ओट्टावा : गेली दहा वर्षे सत्तेमध्ये असणाऱ्या कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला धक्का देत जस्टीन ट्रुडेऊ यांच्या नेतृत्वाखाली लिबरल पक्षाने विजय मिळविला आहे. ४३ वर्षीय जस्टीन ट्रुडेऊ हे माजी पंतप्रधान पिएरे ट्रुडेऊ यांचे पुत्र आहेत. २००६ पासून कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे स्टीफन हार्पर पंतप्रधानपदी होते. लोकांचा कौल आपल्याला मान्य असून आपण पायउतार होत असल्याचे त्यांनी तात्काळ जाहीर केले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जस्टीन ट्रुडेऊ यांचे अभिनंदन केले आहे.
कॅनेडियन संसदेच्या ३३८ एकूण जागांपैकी बहुमतासाठी १७७ जागा मिळविणे आवश्यक असते. यासाठी महत्त्वाच्या तिन्ही पक्षांनी यासाठी कंबर कसल्याचे दिसून येत होते. आज जाहीर झालेल्या निकालांमध्ये लिबरल पक्षाला १८४, कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला ९९, न्यू डेमोक्रॅटस्ना ४४, ब्लॉक क्यूबेकना १०, तर ग्रीन पक्षाला केवळ एक जागा मिळाली आहे. आपला कार्यकाळ यशस्वी ठरला होता, हे दाखविण्यासाठी हार्पर यांनी प्रूवन लीडरशिप फॉर स्ट्राँग कॅनडा अशी घोषणा केली होती, तर न्यू डेमोकॅ्रटिकने रेडी फॉर चेंज, लिबरलने रिअल चेंज अशा घोषणा दिल्या होत्या. ७८ दिवसांचा आजवरचा सर्वात मोठा प्रचारकाळ हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य होते. बहुपक्षीय पद्धतीत कॉन्झर्व्हेटिव्ह, लिबरल, न्यू डेमोकॅ्रटस्, ब्लॉक क्यूबेकियन्स व ग्रीन हे महत्त्वाचे पक्ष आहेत. त्यामध्ये स्टीफन हार्पर, लिबरलचे जस्टीन ट्रुडेऊ, न्यू डेमोक्रॅटस्चे थॉमस म्युलकेअर यांच्यात खरी चुरस होती. (वृत्तसंस्था)
हार्पर कोण होते?
स्टीफन हार्पर हे गेली जवळजवळ १० वर्षे कॅनडाचे पंतप्रधान होते. त्यांच्या कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाने २००६ साली अल्पमतातील सरकार स्थापन करीत सत्तेमध्ये प्रवेश केला.
तेव्हापासून ते या पदावरून देशाचा कारभार सांभाळत आहेत. १९९३ आणि १९९७मध्ये कॅलगरी वेस्ट, तर २००२ पासून कॅलगरी साऊथ वेस्ट मतदारसंघातून ते संसदेत निवडून जात आहेत.
दशकभराच्या काळामध्ये कॅनडाच्या दृष्टीने जागतिक राजकारणात अत्यंत महत्त्वाची कामगिरी त्यांनी बजावली असली, तरी ही निवडणूक त्यांच्यासाठी सोपी नाही, असे ओपिनियन पोलमधून स्पष्ट झाले होते.
नव्या पंतप्रधानांविषयी...
जस्टीन ट्रुडेऊ हे कॅनडाचे माजी पंतप्रधान पिएरे ट्रुडेऊ यांचे पुत्र आहेत. १९७१ साली त्यांचा ओटावा येथे जन्म झाला. पिएरे १९६८ ते ७९ आणि १९८० ते ८४ इतका प्रदीर्घ काळ कॅनडाच्या पंतप्रधानपदी होते. कॅनडा भेटीवर असताना अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी एकेदिवशी जस्टीन देखील पंतप्रधान होईल असे भाकीत केले होते, ते आता खरे ठरले आहे. जस्टीन सोफी ग्रेगॉयर यांच्याशी २००६मध्ये विवाहबद्ध झाले. ते पॅपिनेऊ मतदारसंघातून संसदेत निवडून जातात.
हार्पर यांच्यावरील टीका
हार्पर यांच्या कार्यकाळावर काही प्रश्नचिन्हे उभी केली गेली होती. हार्पर यांनी कॅनडा सरकारचे रूपांतर हार्पर सरकारमध्ये केले, असा आरोप त्यांच्यावर केला जातो. ते सरकारमध्ये आल्यापासून वित्तीय तूट वाढली आणि कर्ज वाढले, असाही आरोप त्यांच्यावर केला जात आहे. २०१० च्या जी-२० सभेसाठी अब्जावधी डॉलर्सचा अनाठायी खर्च केल्याबद्दल त्यांना दोषी धरले जाते.
निवडणुकीतील मुद्दे
कॅनडातील अंतर्गत पर्यावरणीय मुद्दे, स्थलांतरितांचे प्रश्न, त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेतील सुधारणा हे या निवडणुकांमधील महत्त्वाचे मुद्दे होते. कॅनडामध्ये जगभरातील विविध देशांमधून अनेक धर्मांचे, अनेक वंशांचे लोक स्थायिक झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्या भाषा, त्यांची मूल्ये यांची जपणूक होण्यावरही व्यवस्थेकडून भर दिला जातो. त्याचप्रमाणे, फ्रेंच बोलणाऱ्या नागरिकांचे प्रमाणही तितकेच मोठे आहे. त्यामुळे समन्यायी वागणुकीकडेही लक्ष देणे कॅनडा सरकारची महत्त्वाची जबाबदारी ठरते.
19 भारतीय वंशाचे खासदार..
40 भारतीय वंशाचे खासदार रिंगणात होते. सुएरे न्यूटन या मतदारसंघामध्ये चारही उमेदवार भारतीय वंशाचे होते. दीपक ओब्राय हे खासदार सलग सातव्यांदा विजयी झाले आहेत.
2015 च्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे यावेळेस १९ भारतीय वंशाचे खासदार निवडून गेले आहेत.