लिबियाच्या अपह्रत विमानातून सर्व प्रवाशांची सुटका
By admin | Published: December 23, 2016 05:24 PM2016-12-23T17:24:52+5:302016-12-23T20:43:45+5:30
लिबियाच्या प्रवासी विमानाचे अपहरण करणा-या अपहरणकर्त्यांनी विमानातील सर्व 118 प्रवाशांची सुटका केल्याची माहिती आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
वालेटा, दि. 23 - लिबियाच्या प्रवासी विमानाचे अपहरण करणा-या अपहरणकर्त्यांनी विमानातील सर्व 118 प्रवाशांची सुटका केल्याची माहिती आहे. आफ्रिकिया एअरलाईन्सचे एअरबस ए 320 विमान अपहरणकर्त्यांनी माल्टा विमानतळावर उतरवले आहे. दक्षिण लिबीयातील सीबहा येथून या विमानाने त्रिपोलीसाठी उड्डाण केले होते.
अपहरणकर्त्यांनी विमानाचा ताबा घेतल्यानंतर त्यांनी हे विमान माल्टा येथे उतरवण्यास भाग पाडले. या विमानात 111 प्रवासी, सात क्रू सदस्यांसह एकूण 118 जण आहेत. अपहरणकर्त्यांनी ते गद्दाफी समर्थक असल्याचा दावा केला आहे. विमानातील सर्वच्या सर्व 111 प्रवाशांना सोडण्याची आपली इच्छा आहे. पण सात क्रू सदस्यांना सोडणार नसल्याचे अपहरणकर्त्यांनी सांगितले.
अपहरणकर्त्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत ते अजून स्पष्ट झालेले नाही. आपतकालीन यंत्रणा सज्ज असून सुरक्षा जवानांनी आपआपली जागा घेतली आहे. अपहरणकर्त्यांशी वाटाघाटीचे प्रयत्न सुरु आहेत. माल्टाच्या पंतप्रधानांनी टि्वट करुन या अपहरणाची माहिती दिली. आपातकालीन यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. दक्षिण लिबीयातील सीबहा येथून या विमानाने त्रिपोलीसाठी उड्डाण केले होते. माल्टा लिबीयापासून 500 किमी अंतरावर आहे.
2011 मध्ये लिबीयन हुकूमशहा मोअमर गद्दाफीची सत्ता उलथवल्यापासून लिबीयामध्ये गोंधळ सुरु आहे. विविध दहशतवादी गट देशाच्या विविध भागांवर नियंत्रण मिळवण्यासाठी संघर्ष करत आहेत. लिबीयन सरकारच्या फौजांनी नुकतेच सर्टी शहरावर नियंत्रण मिळवले. जून 2015 पासून हा भाग इसिस दहशतवाद्यांचा गड बनला होता.