मंगळावर जीवसृष्टी होती? क्युरिओसिटी रोव्हरला सापडले बिल्डिंग ब्लॉक्स
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2018 03:14 PM2018-06-08T15:14:24+5:302018-06-08T15:14:24+5:30
'मंगळावर सापडलेल्या यो गोष्टी म्हणजे तेथे जीवसृष्टी होती हे सांगणारा पुरावा नाही. मात्र ते प्राचीन जीवसृष्टीचे अंश असण्याची शक्यता आहे
न्यू यॉर्क- पृथ्वीबाहेर एखाद्या ग्रहावर जीवसृष्टी आहे का याचा विचार आपण सतत करत असतो. चंद्रावरही जीवसृष्टी होती का, तेथे माणसाला भविष्यात राहाता येणे शक्य आहे का असे प्रश्नही आपल्याला पडत असतात. पृथ्वीबाहेरील जीवनावर अनेक कथा, चित्रपटही निघाले आहेत. मात्र आता हे केवळ कल्पनेपुरते राहिले नसून कदाचित मंगळावरील जीवसृष्टीचा इतिहास शोधण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे पडले असे म्हणता येईल.
नासाच्या मार्स रोव्हर क्युरुओसिटी यानाला मंगळावरती काही जैविक अणू सापडले असून कार्बनचा अंश असलेले बिल्डिंग ब्लॉक्सही (वीट सदृश्य ठोकळे) सापडले आहेत. त्यामुळे तेथे एकेकाळी जीवसृष्टी असावी असा अंदाज बांधला जात आहे. मंगळाचे वय 3.5 अब्ज वर्षे आहे, त्याची संपूर्ण माहिती व संशोधन करण्यासाठी नासाने मार्स सोव्हर क्युरिओसिटी हे यान मंगळावर पाठवले आहे.
रोव्हरने दिलेल्या माहितीवर शोधनिबंध तयार करणाऱ्या जेनिफर एजिब्रोड यांनी याबाबत सांगितले,''मंगळावर सापडलेल्या यो गोष्टी म्हणजे तेथे जीवसृष्टी होती हे सांगणारा पुरावा नाही. मात्र ते प्राचीन जीवसृष्टीचे अंश असण्याची शक्यता आहे. आपल्याकडे त्याची ठोस माहिती नाही इतकेच. '' नासाच्या ग्रीनबेल्ट, मेरीलँड येथील गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटर येथे ते बोलत होते. जरी तेथे सजीव नव्हते असं पुढे अभ्यासातून लक्षात आलं तरी तेथे सजीवांना खाण्यासाठी काहीतरी उपलब्ध होतं इतका निष्कर्ष आपल्याला काढता येईल असे त्या म्हणाल्या. भूगर्भीय हालचालींमुळे मिथेन निर्माण होऊ शकतो मात्र तेथे सापडलेले पदार्थ हे मंगळावर कायमच राहिले आहेत आणि आपल्यासाठी तीच मोठ्या उत्साहाची बाब आहे अशी जेनिफर यांनी या शोधाचे महत्त्व सांगताना माहिती दिली.
रोव्हरला सापडलेल्या गोष्टी या जैविकदृष्ट्या तयार झाल्या होत्या अशी शक्यता आपण नाकारु शकत नाही. त्या जैविक होत्याच असंही आता म्हणता येणार नाही, पण ती शक्यता संशोधनप्रक्रियेतून वगळलेली नाही असं नासाच्या कॅलिफोर्निय़ा येथिल जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरी (जेपीएल)मधील वरिष्ठ संशोधक ख्रिस वेबस्टर यांनी सांगितले.