प्रवासी विमानावर वीज कोसळली
By admin | Published: July 16, 2014 11:29 PM2014-07-16T23:29:50+5:302014-07-16T23:29:50+5:30
६८ प्रवासी असलेल्या एका अमेरिकी प्रवासी विमानावर वीज कोसळली. सुदैवाने या संकटातून सर्व प्रवासी बचावले. कोणालाही दुखापत झाली नाही
लॉस एंजल्स : १६८ प्रवासी असलेल्या एका अमेरिकी प्रवासी विमानावर वीज कोसळली. सुदैवाने या संकटातून सर्व प्रवासी बचावले. कोणालाही दुखापत झाली नाही. केवळ विमानाच्या हवामान रडारचे नुकसान झाले आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. विजेचा तडाखा बसल्याने फ्रन्टियर एअरलाईन्सचे डेनव्हरहून सिएटलला जात असलेले हे विमान साल्ट लेक सिटीकडे वळविण्यात आले. विजेने विमानाचे हवामान रडार नादुरुस्त झाले होते.
डेनव्हरमधील खराब हवामानामुळे रडारशिवाय विमान तेथे परत नेणे सुरक्षित नव्हते, असे फ्रन्टियर एअरलाईन्सच्या महिला प्रवक्त्या त्यारी स्क्वायरेस यांनी सांगितले.
हे विमान सिएटलला जात असताना सायंकाळी सहा वाजून ५० मिनिटांनी त्यावर वीज कोसळली. त्यामुळे विमान मागे वळून साल्ट लेक सिटीत उतरले. १६८ प्रवाशांपैकी कोणीही जखमी झाले नाही तसेच हवामान रडार वगळता विमानाचे अन्य कोणतेही नुकसान झालेले नाही, असे डेनव्हर पोस्टच्या वृत्तात म्हटले आहे. हवामान रडारची दुरुस्ती करावी लागल्यामुळे हे विमान अनेक तास ‘साल्ट लेक’मध्ये खोळंबले होते.
पायलटने सर्व प्रवाशांना पिझ्झाची मेजवानी दिल्यामुळे फ्रन्टिअर एअरलाईन्स गेल्या आठवड्यात चर्चेत आली होती. (वृत्तसंस्था)