काळ्या पैशांची यादी तयार !
By admin | Published: June 23, 2014 03:26 AM2014-06-23T03:26:18+5:302014-06-23T03:26:18+5:30
काळा पैसा शोधून काढण्याच्या भारताच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत स्वित्झर्लंड सरकारने स्विस बँकेत काळा पैसा ठेवणाऱ्या भारतीयांची यादी तयार केली असून, त्याचे तपशील भारत सरकारला दिले जात आहेत
झुरीक : काळा पैसा शोधून काढण्याच्या भारताच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत स्वित्झर्लंड सरकारने स्विस बँकेत काळा पैसा ठेवणाऱ्या भारतीयांची यादी तयार केली असून, त्याचे तपशील भारत सरकारला दिले जात आहेत.
स्वित्झर्लंडमधील विविध बँकांत ठेवलेल्या पैशाचा नक्की लाभ कोणाला होतो, याचा शोध घेत असताना या भारतीयांची नावे समोर आली आहेत, असे स्विस सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या लोकांचा पैसा कर न भरता ठेवलेला असावा असा अंदाज आहे. कर न भरता किंवा कायदेशीर बाबी पूर्ण न करता हा पैसा ट्रस्ट, डोमिसिलरी कंपन्या, इतर मार्गाने हा पैसा दुसऱ्या बिगरभारतीय देशातून स्विस बँकांत वळविण्यात आला आहे. हा पैसा नावावर असलेल्या व्यक्ती वा संस्था यांची नावे देण्यास या अधिकाऱ्याने नकार दिला. भारत व स्वित्झर्लंड यांच्यात गुप्ततेचा करार असल्याचे कारण त्याने दिले आहे.
या अधिकाऱ्याला माध्यमांशी बोलण्याची परवानगी नाही, त्यामुळे त्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, ही यादी स्विस सरकारने स्वत: होऊन तयार केली आहे. त्यामुळे याआधी भारतीय अधिकाऱ्यांनी मागितलेली माहिती, बाहेर पसरलेली माहिती, काही बँकांची चोरून मिळविलेली यादी असे या माहितीचे स्वरूप नाही. ही कथित एचएसबीसीची यादी नाही, असे त्याने स्पष्ट केले आहे.
भारतातील नव्या सरकारबरोबर काम करण्याची आमची तयारी आहे, तसेच नुकत्याच स्थापन झालेल्या एसआयटी (स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम)लाही सहकार्य करू, असे त्याने सांगितले. (वृत्तसंस्था)