पत्नीला पाठीवर उचलून 'तो' धावला अन् वर्ल्ड चॅम्पियन ठरला!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 03:23 PM2018-07-09T15:23:01+5:302018-07-09T16:15:54+5:30
बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना आणि भूमि पेडणेकर यांच्या 'दम लगा के हईशा' सिनेमात पाहायला मिळालेली 'दम लगाओ' या स्पर्धेचं आता जागतिक पातळीवरही आयोजन करण्यात आलंय.
फिनलँड - बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना आणि भूमि पेडणेकर यांच्या 'दम लगा के हईशा' सिनेमात पाहायला मिळालेली 'दम लगाओ' या स्पर्धेचं आता जागतिक पातळीवरही आयोजन करण्यात आलंय. तुम्हाला वाचून कदाचित आश्चर्य वाटेल, पण हे खरंय. 'दम लगा के हईशा' सिनेमात आयुष्मान खुराना ज्या पद्धतीनं भूमि पेडणेकरला आपल्या पाठीवर उचलून घेत कठिणातील कठीण मार्ग पार करत स्पर्धा सहभाग नोंदवतो. अगदी तशाच पद्धतीच्या स्पर्धेच चक्क फिनलँडमध्ये आयोजन करण्यात आले होते.
फिनलँडमधील सोन्कायार्बी शहरात 'वर्ल्ड वाइफ केअरिंग चॅम्पिअनशिप'चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 53 पुरुषांनी सहभाग नोंदवला होता. या 53 पुरुषांनी आपल्या खांद्यावर आपल्या पत्नीला उचलून घेत जवळपास तासाभराचा रस्ता पार करत स्पर्धेत सहभाग नोंदवला. हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत ही अनोखी स्पर्धा पार पडली. विशेष म्हणजे गेल्या 23 वर्षांपासून या स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे.
या स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठी स्पर्धकांना सुरुवातीला क्वॉलिफाइंग राउंडचीही परीक्षा द्यावी लागते. अमेरिका, ब्रिटन, स्वीडन, अॅस्टोनिया यांच्यासहित 13 देशांमधील 53 पुरुषांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. गेल्या शनिवारी पार पडलेल्या या स्पर्धेत लिथुआनियातीस वीतोतस आणि त्याची पत्नी नेरिंगानं विजय मिळवला. पाणी, निसटता पूल, अशा अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी ही स्पर्धा जिंकली आहे. या दाम्पत्यानं 2005मध्ये स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.