तब्बल २० लाख मुलांना जीवनदान; ६३ वर्षांत १,१०० वेळा रक्तदान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 12:37 AM2018-05-18T00:37:11+5:302018-05-18T00:37:11+5:30
६३ वर्षांत १,१०० वेळा रक्तदान करून, आईच्या उदरात मरण पावली असती, अशा २० लाखांहून अधिक मुलांना जीवनदान देण्याचे पुण्य गाठीशी बांधून जेम्स हॅरिसन या आॅस्ट्रेलियातील महादानशूर रक्तदात्याने वयाच्या ८१ व्या वर्षी ‘निवृत्ती’ जाहीर केली.
कॅनबेरा : ६३ वर्षांत १,१०० वेळा रक्तदान करून, आईच्या उदरात मरण पावली असती, अशा २० लाखांहून अधिक मुलांना जीवनदान देण्याचे पुण्य गाठीशी बांधून जेम्स हॅरिसन या आॅस्ट्रेलियातील महादानशूर रक्तदात्याने वयाच्या ८१ व्या वर्षी ‘निवृत्ती’ जाहीर केली. इंजेक्शनच्या सुईचीही भीती वाटणाऱ्या जेम्स हॅरिसन यांनी रक्तदानासाठी दंडात अनेकदा सुया टोचून घेतल्याने ते आॅस्ट्रेलियन ‘कर्ण’ ‘मॅन विथ ए गोल्डन आर्म’ म्हणून ख्यातनाम होते.
अनेक महिलांना गरोदरपणात ºह्युसस हा घातक आजार झाल्याने किंवा त्यांच्या रक्तात प्राणघातक ‘अॅन्टीबॉडिज’ तयार झाल्याने त्यांच्या पोटातील मूल जन्माला येण्याआधीच दगावण्याचा धोका असतो. यावर ‘अॅन्टी-डी’ नावाचे औषध हा रामबाण उपाय आहे. हे औषध मानवी रक्तातील अतिदुर्मीळ घटकापासून तयार होते. हॅरिसन यांच्या रक्तात हा घटक होता. त्यांनी दान केलेले रक्त ‘अॅन्टी-डी’ तयार करण्यासाठी वापरले गेले. या औषधाच्या म्हणजेच हॅरिसन यांच्या रक्तामुळे जन्माला येण्याआधीच दगावली असती अशा २० लाखांहून अधिक मुलांना जीवनदान मिळाले. हॅरिसन १९६७ पासून यांच्या रक्ताच्या प्लाझ्मातून बनवलेल्या ‘अॅन्टी-डी’ लसीचे डोस ३० लाखांहून अधिक महिलांना दिले, असे आॅस्ट्रेलियन रेड क्रॉस ब्लड सर्व्हिसने सांगितले. ‘अॅन्टी-डी’ लसीचा फायदा त्यांच्या मुलीलाही झाला. (वृत्तसंस्था)
>१४ व्या वर्षी केला संकल्प
हॅरिसन १४ वर्षांचे असताना त्यांच्या छातीवर मोठी शस्त्रक्रिया झाली. अनेकांनी रक्त दिल्याने त्यांचे प्राण वाचले. त्यांच्या रक्तात दुर्मीळ ‘अॅन्टीबॉडी’ असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. डॉक्टरांनी त्यांना त्यांच्या रक्ताचे महात्म्य समजावून सांगितले. हॅरिसन यांनी लगेच रक्तदान करण्याचा संकल्प केला. परंतु वयाची १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत त्यांना थांबावे लागले. त्यानंतर त्यांचा पवित्र रक्तदानयज्ञ अव्याहतपणे सुरूराहिला.रेड क्रॉस ब्लड सर्व्हिसनुसार, हॅरिसन यांच्याप्रमाणे रक्तात दुर्मीळ ‘अॅन्टीबॉडी’ असलेल्या जेमतेम ५० व्यक्ती आॅस्ट्रेलियात आहेत. हॅरिसन यांच्या निवृत्तीमुळे असे इतर लोक सेवेसाठीपुढे येतील, अशी आशा आहे. हॅरिसन यांना अमूल्य सेवेबद्दल ‘मेडल आॅफ दी आॅर्डर आॅफ आॅस्ट्रेलिया’ या सर्वोच्च नागरी सन्मानासह इतरही अनेक पुरस्कारांनी गौरविले गेले.
>मी काही महान केले असे मला वाटत नाही. माझ्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. अनेक मुले या जगात आली, याचे समाधान वाटते. - जेम्स हॅरिसन