बलात्काराच्या भीतीने जगता जगता मरताना; हजारो स्त्रिया लैंगिक छळाच्या बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 08:12 AM2021-08-31T08:12:09+5:302021-08-31T08:13:53+5:30

हैती हा कॅरेबियनमधील एका बेटावर वसलेला छोटासा गरीब देश. काही ना काही करणांनी, नैसर्गिक आपत्तींमुळे हा देश कायम चर्चेत असतो.

Living and dying in fear of rape; Thousands of women are victims of sexual harassment haiti pdc | बलात्काराच्या भीतीने जगता जगता मरताना; हजारो स्त्रिया लैंगिक छळाच्या बळी

बलात्काराच्या भीतीने जगता जगता मरताना; हजारो स्त्रिया लैंगिक छळाच्या बळी

Next

हैती हा कॅरेबियनमधील एका बेटावर वसलेला छोटासा गरीब देश. काही ना काही करणांनी, नैसर्गिक आपत्तींमुळे हा देश कायम चर्चेत असतो. भूकंपांचा अतिशय वेदनाकारी इतिहास या देशाला आहे. त्यामुळे हा देश जवळपास उद्ध्वस्त झाला आहे. त्यातून सावरायला त्यांना उसंतच मिळालेली नाही. ११ वर्षांपूर्वी या देशात आलेल्या भूकंपाच्या वेदना तर नागरिक अजूनही विसरलेले नाहीत आणि त्याच्या आठवणींनीही त्यांच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी येते. कारण त्या वेळच्या भूकंपाने लक्षावधी हैती नागरिकांना केवळ बेघरच केले नाही, तर त्यात तब्बल दोन लाखांपेक्षाही अधिक नागरिक ठार झाले होते.

जखमी झालेल्यांची तर गिणतीच नाही. त्याबाबत आजही वेगवेगळे आकडे सांगितले जातात. या भूकंपानंतर लाखो लोकांना तात्पुरत्या छावण्यांमध्ये आश्रय घ्यावा लागला होता. या छावण्या खरंच ‘तात्पुरत्या’ आणि कामचलावू असल्या तरी आजही या छावण्यांमध्ये लाखो लोक राहतात. या ठिकाणी कोंबण्यात आलेल्या गर्दीमुळे लोकांना अक्षरश: कुत्र्या-मांजरांचे जिणे जगावे लागत आहे. त्यात सर्वाधिक हाल होताहेत ते महिला आणि लहान मुलांचे. त्यानंतरही हैतीमध्ये काही लहान-मोठे भूकंप झाले; पण अलीकडेच काही दिवसांपूर्वी हैतीला आणखी एका विनाशकारी भूकंपाला सामोरे जावे लागले.

७.२ रिश्टर स्केलच्या या भूकंपातही हजारो गावे नष्ट झाली आणि आतापर्यंत जवळपास २५०० लोकांना मृत्यूला सामोरे जावे लागले. त्यामुळे आणखी अनेक लोकांना या तात्पुरत्या छावण्यांमध्ये हलवण्यात आले. तिथे ना खाण्यापिण्याची सोय आहे, ना योग्य निवाऱ्याची, ना वैयक्तिक स्वच्छतेची. विजेचीही व्यवस्था येथे नसल्याने लोक अक्षरश: अंधारकोठडीचा अनुभव घेताहेत. 

येथे राहणाऱ्या महिला, विशेषत: तरुणी तर जीव मुठीत धरून जगत आहेत. त्यांचे म्हणणे आहे, आम्हाला रस्त्यावर आणणाऱ्या या भूकंपाने आमचे सर्वस्व तर हिरावलेच; पण आमची सुरक्षाही धोक्यात आली आहे. येथे ‘बंदोबस्ता’ला असलेले शस्त्रधारी ‘रक्षक’ तर अक्षरश: आमचा उपभोग घेण्यासाठी टपूनच बसले आहेत. या छावण्यांमधील अनेक महिला आणि तरुणींवर बलात्कार झाले आहेत आणि बलात्कार करण्यात येथील ‘रक्षक’च सर्वांत पुढे आहेत.

याच छावणीत राहणारी वेस्टा गुरियर ही महिला म्हणते, मी इथे नवरा आणि मुलासह राहते; पण मला केव्हाही उचलून नेतील आणि माझ्यावर बलात्कार करतील, अशी भीती मला सतत वाटते. एवढ्याशा खोपट्यांमध्ये इथे इतकी गर्दी आहे की, महिलांना धड ना वैयक्तिक स्वच्छता बाळगता येत, ना धड अंघोळ करता येत. कारण सगळ्या बाजूने वखवखलेल्या नजरा  टपलेल्याच असतात. अंघोळ करण्यासाठी मी रात्रीची वाट पाहते आणि सर्व कपडे घालूनच अंघोळ करावी लागते. अशात एखादा ‘प्रकाशझोत’ तुमच्यावर फिरला म्हणजे, हा आपल्या शेजाऱ्याचा किंवा तसले काही करण्याची इच्छा असणाऱ्या नराधमाचाच प्रताप आहे, अशी भीती वाटायला लागते!

हैतीमध्ये २०१० मध्ये झालेल्या भूकंपानंतर तर छावण्यांमध्ये असलेल्या महिलांवर अत्याचार करण्याची जणू लाटच आली होती. हजारो स्त्रिया लैंगिक छळाच्या बळी पडल्या. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल या संस्थेनेही याबाबत चिंता व्यक्त केली होती आणि जेवढ्या महिलांवर बलात्कार झाल्याचे सांगण्यात येत आहे, त्यापेक्षा ही संख्या कितीतरी अधिक असल्याचे त्यांचे म्हणणे होते. अनेक स्वयंसेवी संस्थांनीही त्याला दुजोरा दिला होता.

धड स्वच्छतागृहेदेखील नसल्याने हे निवारे म्हणजे महिलांसाठी अक्षरश: छळछावण्याच ठरत आहेत.फ्रान्सिस डोरिसमोंड ही तीन महिन्यांची गर्भवती तरुणी म्हणते, कुठे जावे, काय करावे, कसे स्वत:ला वाचवावे काहीच कळत नाही. आम्ही खरंच खूप घाबरलेलो आहोत. आमच्या मुलांचीही आम्हाला खूप काळजी वाटते. या ‘छळछावण्यां’तून बाहेर काढून तात्पुरते का होईना; पण किमान तंबू तरी द्यावेत, म्हणजे आमच्या कुटुंबासह आम्हाला तिथे राहता येईल!

काही दिवसांची  बाळंतीण असलेल्या जस्मीन नोएलचा अनुभवही अतिशय विदारक आहे. इथे कोण खरंच आपल्या मदतीसाठी आलाय, की आपल्याला ओरबाडण्यासाठी आलाय, हेच कळत नाही. नाही म्हणायला छावणीमध्येच आता काही स्वयंसेवी गट तयार झाले आहेत. महिलांची काळजी घेण्यासाठी ते आता पुढे आले आहेत. माझ्या लहान बाळाला घेऊन रात्री रस्त्याच्या कडेला असलेल्या आडोशाला झोपायला जात असताना याच गटाच्या तरुण मुलांनी मला थांबवले, इथे झोपणे सुरक्षित नाही, असे सांगितले आणि दुसऱ्या चांगल्या ठिकाणी ते घेऊन गेले!

छावणीभोवती जागता पहारा!

इथल्या अनेक महिला सांगतात, परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी सारे जण इथे टपलेलेच आहेत. शरीराने आम्ही जिवंत असलो, तरी आमचा आत्मा कधीच मृत झालाय. श्वास चालू असलेले महिलांचे ‘मृतदेह’ इथे हजारोंनी सापडतील; पण या अंधारकोठडीत काही आशेचे किरणही दिसताहेत. पेस्टर मिलफोर्ट रुझवेल्टसारख्या तरुणांनी आपलीच एक ‘आर्मी’ तयार केली आहे. महिलांच्या संरक्षणासाठी रात्रभर ते छावणीभोवती जागता पहारा देतात!

Web Title: Living and dying in fear of rape; Thousands of women are victims of sexual harassment haiti pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.