लिज ट्रस यांना कधीही हार पत्करायला आवडत नाही; अशी आहेत सुनक यांच्या पराभवाची कारणे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 11:52 AM2022-09-06T11:52:09+5:302022-09-06T11:52:47+5:30
पंतप्रधानपदाच्या शर्यतीत लिज ट्रस याच जिंकणार असा निष्कर्ष जनमत चाचण्यांतूनही काढण्यात आला होता. ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषी सुनक यांच्या रूपाने पहिल्यांदाच एखादी भारतीय व्यक्ती उतरली होती.
लंडन : ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान लिज ट्रस यांना कधीही हार पत्करायला आवडत नाही. अगदी बालपणापासून त्यांचा हा स्वभावविशेष दिसून आला आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीसाठी हुजूर पक्षात झालेल्या निवडणुकीतही त्यांनी हिरिरीने आपला प्रचार केला.
लिज ट्रस यांचा जन्म २६ जुलै १९७५ रोजी झाला. त्यांचे वडील जॉन केनेथ हे लीड्स विद्यापीठात प्राध्यापक, तर आई प्रिसिलिया मेरी ट्रस या एका शाळेत शिक्षिका होत्या. लिज ट्रस यांचे शालेय शिक्षण राऊंडहे स्कूलमध्ये झाले, तर उच्च शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठात झाले. लिज यांच्या पतीचे नाव हग ओलॅरी असून, या दाम्पत्याला दोन मुली आहेत. साऊथवेस्ट नॉरफॉक हा ट्रस यांचा मतदारसंघ आहे.
भारत-ब्रिटनचे संबंध आणखी दृढ व्हावेत, दोन्ही देशांतील आर्थिक सहकार्य आणखी वाढीस लागावे असे लिज ट्रस यांचे मत आहे.
वादग्रस्त बोरिस जॉन्सन यांच्यामुळे झाला हाेता पेच
- मावळते पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. कोरोना साथीच्या काळात निर्बंध असूनही सरकारी कार्यालये, बंंगल्यांमध्ये झालेल्या पार्ट्यांमध्ये सहभागी झाल्याबद्दल बोरिस जॉन्सन यांच्यावर विरोधी पक्ष, तसेच हुजूर पक्षातूनही टीका झाली होती. त्यामुळे बोरिस जॉन्सन यांना पंतप्रधानपदावरून हटविण्याचा हुजूर पक्षाने विचार सुरू केला.
- त्या पक्षाच्या प्रमुखपद व पंतप्रधानपदासाठी उमेदवार निवड करण्याकरिता झालेल्या पक्षांतर्गत निवडणुकीत लिज ट्रस यांच्याकडेच बहुतांश नेते, लोकप्रतिनिधींचा कल होता. या निवडणुकीसाठी दोन महिने प्रचारमोहीम सुरू होती.
या कारणांमुळे लिज ट्रस यांचा झाला विजय
- पंतप्रधानपदाच्या शर्यतीत लिज ट्रस यांनी कधीही बचावात्मक प्रचार केला नाही. त्यांनी अत्यंत हुशारीने स्वत:ची बाजू हुजूर पक्षातील मतदारांसमोर मांडली.
- वादग्रस्त ठरलेल्या बोरिस जॉन्सन यांची लिज ट्रस यांनी कधीही साथ सोडली नाही. जॉन्सन यांची चांगली कामेही त्या मांडत राहिल्या.
- आयकरात १.२५ टक्के कपात करण्याचे तसेच कॉर्पोरेशन टॅक्स मागे घेण्याचे आश्वासन लिज ट्रस यांनी दिले.
- युक्रेनवर लादलेल्या युद्धाबाबत लिज ट्रस यांनी ठाम भूमिका घेतली. या युद्धासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हेच जबाबदार असल्याचे ट्रस यांनी सांगितले.
ही आहेत सुनक यांच्या पराभवाची कारणे
- ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीतील भारतीय वंशीय उमेदवार ऋषी सुनक हे उत्कृष्ट वक्ते होते; पण आर्थिक संकटाचा मुकाबला करण्यासाठी त्यांनी स्वीकारलेला संतुलित दृष्टिकोन हुजूर पक्षातील मतदारांना आवडला नाही. श्रीमंत टेक्नोक्रॅट अशी सुनक यांची असलेली प्रतिमाही त्यांच्या विजयाच्या आड आली.
- बोरिस जॉन्सन यांना पंतप्रधानपदावरून दूर करण्यासाठी सुनक यांनी मंत्रिपदाचा त्याग केला. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उडी घेतली. काही जणांना ही कृती पाठीत खंजीर खुपसल्यासारखी वाटली.
- ऋषी सुनक यांची पत्नी अक्षता ही महाराणी एलिझाबेथ यांच्यापेक्षा श्रीमंत आहे, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले. पारंपरिक गोष्टींवर प्रेम करणाऱ्या हुजूर पक्षाच्या मतदारांना हे वास्तव आवडले नाही.
- हुजूर पक्षात झालेल्या निवडणुकांच्या प्रचारासाठी वंचित भागांतूनही निधी गोळा केल्याचे सुनक यांनी मान्य केल्याचा एक व्हिडिओ झळकला होता. याचाही परिणाम दिसून आला.
लिज ट्रस यांचा आज स्काॅटलंडमध्ये शपथविधी
लिज ट्रस यांचा उद्या, मंगळवारी शपथविधी होणार आहे. मावळते पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे १० डाउनिंग स्ट्रीट येथील पंतप्रधान निवासस्थानातून जनतेला उद्देशून भाषण करतील. त्यानंतर महाराणी एलिझाबेथ यांची स्कॉटलंडमधील एबर्डिनशायर येथे भेट घेऊन जॉन्सन त्यांचा पंतप्रधानपदाचा राजीनामा सुपूर्द करतील. नव्या पंतप्रधानांचा शपथविधी लंडनमधील बंकिमहम पॅलेसमध्ये होतो. पण ९६ वर्षांच्या महाराणी एलिझाबेथ यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे ही परंपरा यावेळी पाळली जाणार नाही. लिज ट्रस यांचा पंतप्रधानपदाचा शपथविधी शपथविधी सध्या महाराणी एलिझाबेथ यांचे वास्तव्य असलेल्या स्कॉटलंडच्या बाल्मोरल कॅसलमध्ये होणार आहे.
मार्गारेट थॅचर यांचा आदर्श -
ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान लिज ट्रस यांच्या मार्गारेट थॅचर या आदर्श आहेत. १९७५ ते १९९० या कालावधीपर्यंत मार्गारेट थॅचर या ब्रिटनच्या पंतप्रधान व हुजूर पक्षाच्या प्रमुख होत्या. थॅचर यांचा उल्लेख आयर्न लेडी असा करण्यात येत असे. ब्रिटनच्या दुसऱ्या महिला पंतप्रधान थेरेसा मे या २०१६ ते २०१९ या कालावधीत त्या पदावर होत्या. लिज ट्रस या थॅचर यांच्यासारख्याच कणखर व्यक्तिमत्त्वाच्या आहेत. ट्रस यांनी कधीही बचावात्मक पवित्रा घेतला नाही.
ट्रस यांना होता कौल -
पंतप्रधानपदाच्या शर्यतीत लिज ट्रस याच जिंकणार असा निष्कर्ष जनमत चाचण्यांतूनही काढण्यात आला होता. ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषी सुनक यांच्या रूपाने पहिल्यांदाच एखादी भारतीय व्यक्ती उतरली होती. त्यासाठी झालेली निवडणूक लढविणारी पहिली भारतीय वंशाची व्यक्ती म्हणूनही सुनक यांच्या नावाची नोंद झाली आहे.