बांगला हत्याकांडामागे स्थानिक दहशतवादी!

By admin | Published: July 4, 2016 04:13 AM2016-07-04T04:13:41+5:302016-07-04T06:01:58+5:30

हत्याकांडाबद्दल बांगलादेशने रविवारी देशातच वाढलेले इस्लामी दहशतवादी आणि पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटना आयएसआयला जबाबदार धरले.

Local militants behind Bangla massacre! | बांगला हत्याकांडामागे स्थानिक दहशतवादी!

बांगला हत्याकांडामागे स्थानिक दहशतवादी!

Next


ढाका : देशाला मुळापासून हादरवून सोडलेल्या हत्याकांडाबद्दल बांगलादेशने रविवारी देशातच वाढलेले इस्लामी दहशतवादी आणि पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटना आयएसआयला जबाबदार धरले. या भयंकर हल्ल्यात ओलिस धरण्यात आलेल्या २० विदेशी नागरिकांची गळे चिरून हत्या झाली.
या हल्ल्यात इस्लामिक स्टेटची भूमिका नाही, असेही स्पष्ट करण्यात आले. या हत्याकांडाबद्दल देशात दोन दिवस दुखवटा पाळला जात आहे. गृहमंत्री असदुझ्झमन खान यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले की, ‘ बांगलादेशात इसिस किंवा अल कायदाचे अस्तित्व नाही हे मला स्पष्ट करायचे आहे. विदेशी नागरिकांना ज्यांनी ओलिस धरले होते ते सगळे देशातच वाढलेले दहशतवादी होते, इसिस किंवा आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचे नव्हते.’ ओलिस धरणारे वत्यांचे पूर्वज कोण आहेत याची कल्पना आहे. ते सगळे बांगलादेशात वाढलेले होते व ते जमातुल मुजाहिदीन बांगलादेशसारख्या (जेएमबी) संघटनांशी संबंधित आहेत.
ओलिस धरलेले व मृतांमध्ये बहुसंख्य विदेशी नागरिक व दोन पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश होता. हे हत्याकांड आम्ही घडविल्याचा दावा इस्लामिक स्टेटने (इसिस) केला होता. होले आर्टिसन बेकरीत घुसून दहशतवाद्यांनी शुक्रवारी रात्री सुरू केलेले हे ओलिस धरून केलेले हत्याकांड सत्र ११ तासांनी शनिवारी संपले. लष्कराने बेकरीवर कारवाई केली त्यात सहा हल्लेखोर ठार झाले, तर एकाला जिवंत पकडण्यात आले.
हल्लेखोरांनी ओलिसांची ज्या मोठ्या कोयत्याने हत्या केली ती बघता त्यात बंदी घालण्यात आलेल्या स्थानिक जमात- उल- मुजाहिदीन या दहशतवादी गटाचा हात असल्याचे सूचित होते, असे पंतप्रधान शेख हसीना यांचे राजकीय सल्लागार हुसेन तौफिक इमाम यांनी म्हटले. आयएसआय आणि जमातमधील संबंध सर्वांना माहीत आहेत. त्यांना सध्याचे सरकार काढून टाकायचे आहे, असे इमाम दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. ताब्यात घेण्यात आलेल्या दहशतवाद्याकडे महत्त्वाची माहिती आहे, असेही ते म्हणाले.
ओलिस धरून ठार मारलेल्यांमध्ये १९ वर्षांची भारतीय तरुणी तारिशी जैन, नऊ इटालियन, सात जपानी, एक बांगलादेशी वंशाचा अमेरिकन, दोन बांगलादेशींचा समावेश आहे. बहुतेक मृतांचा गळा चिरल्याचे आढळले आहे.
>तारिशीच्या अंगावर जखमा
अमेरिकेतून उन्हाळी सुट्यांसाठी येथे आलेली तारिशी जैन (१९) ही होले आर्टिझन बेकरीमध्ये शुक्रवारी सायंकाळी तिच्या दोन मैत्रिणींसोबत गेली होती. ढाक्यातील पॉश गुलशन भागात असलेल्या तिच्या घराजवळ ही बेकरी होती व तेथील पदार्थांची तिला मोठी आवड होती. तिचे वडील संजीव जैन यांचा ढाक्यामध्ये १५-२० वर्षांपासून कपड्यांचा व्यवसाय आहे.
बेकरीत ओलिस प्रकरण सुरू झाल्यानंतर पहिला बळी पडली ती तारिशी. तिच्या मैत्रिणी अनबिता कबीर आणि फराज हुसेन यांचाही हल्ल्यात मृत्यू झाला.
सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार तारिशी जैनसह अन्य ओलिसांचा त्यांना ठार मारण्यापूर्वी शारीरिक छळ झाल्याचे त्यांच्या शरीरावरील जखमांतून स्पष्टपणे दिसते.
तारिशी जैनचा मृतदेह फिरोजाबादेत आणणार
नवी दिल्ली : तारिशी जैन हिचा मृतदेह तिच्या मूळ गावी फिरोजाबाद (उत्तर प्रदेश) येथे आणण्यासाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या तिच्या नातेवाईकांशी समन्वय राखून आहेत. मी तिचे वडील संजीव जैन यांच्याशी फोनवर बोलले व तिच्या मृत्यूबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. या अतीव दु:खद प्रसंगात देश त्यांच्यासोबत आहे, असे स्वराज म्हणाल्या. आम्ही तिच्या कुटुंबियांसाठी व्हिसाची सोय करीत आहोत. तारिशीचा मृतदेह नवी दिल्लीत आणला जाऊन तो फिरोजाबादेत नेला जाईल, असेही त्या म्हणाल्या.

Web Title: Local militants behind Bangla massacre!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.