स्थानिकांनी दहशतवादाविरोधात कधीच आवाज उठवला नाही, तालिबानच्या ताब्यानंतर अफगाण महापौरांचं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 12:24 PM2021-08-25T12:24:12+5:302021-08-25T12:31:34+5:30
Taliban Afghanistan Crisis : अफगाणिस्तावर तालिबाननं पुन्हा केला कब्जा. तालिबानच्या ताब्यानंतर अनेक लोकांनी देश सोडण्यास केली होती सुरूवात.
अफगाणिस्तानाततालिबाननं ताबा मिळवला होता. त्यानंतर देशातील अनेकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांमध्ये सर्वाधिक भीतीचं वातावरण आहे. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानच्या पहिल्या महिला महापौर जरीफा गफारी या नुकत्याच अफगाणिस्तानातून जर्मनीत गेल्या होत्या. गफारी यांनी तालिबानच्या कब्ज्यासाठी आपल्या देशातील लोकांना जबाबदार धरलं. स्थानिक लोक, राजकारणी आणि तरूण देशाच्या सध्याच्या परिस्थितीसाठी जबाबदार असल्याचे त्या म्हणाल्या.
"आज अफगाणिस्तानात जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यासाठी स्थानिक लोक, राजकारणी, तरूण आणि आंतरराष्ट्रीय समुदायासह सर्वांना जबाबदार धरायला हवं. स्थानिकांनी दशहतवादासहित सर्वांच्या विरोधात कधीही एकत्र येऊन आवाज उठवला नाही," असं गफारी म्हणाल्या. एएनआयशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान, त्यांनी यावर भाष्य केलं.
अफगाणिस्तानातील संकटाकडे लक्ष वळवण्यासाठी आपण निरनिराळ्या देशांच्या बड्या अधिकाऱ्यांची, राजकारण्यांची आणि महिलांची भेट घेण्यावर आपण विचार करत असल्याचं त्या म्हणाल्या. "माझा उद्देश निरनिराळ्या देशांच्या उच्चपदस्थ अधिकारी, राजकारणी आणि महिलांची भेट घेणं हा आहे. ज्या माध्यमातून अफगाणिस्तानच्या सध्याच्या परिस्थितीची माहिती त्यांना देणार आहे. तसंच आंदोलन सुरू करण्यासाठी आपल्यासोबत सहभागी होण्यासाठी सांगितलं जावं," असंही गफारी म्हणाल्या.