किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 08:52 AM2024-05-18T08:52:56+5:302024-05-18T08:53:50+5:30
भारतीय विद्यार्थी देखील भीतीच्या छायेखाली असून त्यांनाही निशाना बनविण्यात येत आहे. परंतु अद्याप कोणत्याही भारतीय विद्यार्थ्याला इजा झाल्याचे वृत्त आलेले नाही.
किर्गिस्तानमध्ये मेडिकलचे शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या भारतीय आणि पाकिस्तानी विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. तेथील स्थानिक लोक या विद्यार्थ्यांवर जिवघेणा हल्ला करत आहेत. या विद्यार्थ्यांविरोधात लोक हिंसाचार करत असून याचे व्हिडीओ या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. बातमीनुसार या हल्ल्यात तीन पाकिस्तानी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
कोणत्या कारणामुळे हा हिंसाचार उफाळून आला हे अद्याप समजू शकलेले नाही. या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी शरण घेतली आहे. बिश्केकमध्ये असलेल्या पाकिस्तानी दुतावासाने आपत्कालीन नंबर जारी करत विद्यार्थ्यांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे.
भारतीय विद्यार्थी देखील भीतीच्या छायेखाली असून त्यांनाही निशाना बनविण्यात येत आहे. परंतु अद्याप कोणत्याही भारतीय विद्यार्थ्याला इजा झाल्याचे वृत्त आलेले नाही. एका व्हिडीओमध्ये काही लोक एका विद्यार्थ्याच्या हाता-पायाला धरून खेचून नेत आहेत. तसेच उपस्थित जमाव हे पाहून शिट्ट्या वाजवत आहे. तर पोलीस तिथे असूनही तमाशा पाहत आहेत. मुलींवरही हल्ले केले जात आहेत.