पाकव्याप्त काश्मिरातील झेलम नदीवर चीनचा प्रकल्प , हायड्रो पॉवर प्रोजेक्टला स्थानिकांचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 05:32 AM2020-07-08T05:32:34+5:302020-07-08T05:33:17+5:30
पाकिस्तान सरकारने पाकव्याप्त काश्मीरच्या सुधानोटी जिल्ह्यात झेलम नदीवर आझाद पट्टान हायड्रो प्रोजेक्टची घोषणा केली.
मुजफ्फराबाद - नीलम आणि झेलम नदीवर चीन अवैधपणे धरण तयार करीत आहे, असा आरोप करीत पाकव्याप्त काश्मिरातील मुजफ्फराबादमध्ये स्थानिक लोकांनी जोरदार निदर्शने केली. सोमवारी निघालेल्या या रॅलीला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
आंदोलकांचे म्हणणे आहे की, यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होणार आहे. टिष्ट्वटरवर सेव्ह रिव्हरचा ट्रेंड दिसून आला. आंदोलकांनी प्रशासनाला सवाल केला की, अखेर कोणत्या कायद्यांतर्गत या जागेवर धरण उभारण्यासाठी पाकिस्तान आणि चीनमध्ये करार झाला आहे? या नद्यांवर कब्जा करून पाकिस्तान आणि चीन संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावांचे उल्लंघन करीत आहेत.
पूर्व लडाखमध्ये सीमेवर तणाव असताना चीन आणि पाकिस्तानने अब्जावधी डॉलरचा करार केला आहे. पाकव्याप्त काश्मिरात कोहोलामध्ये २.४ अब्ज डॉलरच्या १,१२४ मेगावॅट हायड्रो पॉवर प्रोजेक्टसाठी हा करार झाला आहे.
पाकिस्तान सरकारने पाकव्याप्त काश्मीरच्या सुधानोटी जिल्ह्यात झेलम नदीवर आझाद पट्टान हायड्रो प्रोजेक्टची घोषणा केली. हे धरण चीन- पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरचा भाग आहे. पाकिस्तान सरकार आणि चीनची कंपनी यांच्यात या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.