पुन्हा ‘लॉकडाउन’! 1 कोटी लोकांना घरात राहण्याचे निर्देश, वर्क फ्रॉम होम लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 07:48 PM2023-02-02T19:48:30+5:302023-02-02T19:49:51+5:30
जागतिक आरोग्य संघटनेच्या इशाऱ्यानंतर या शहरातील लोकांना इशारा देण्यात आला आहे.
कोरोना व्हायरसमुळे घरात राहण्याच्या आठवणी आजही प्रत्येकाच्या मनात ताज्या असतील. लॉकडाऊनमुळे जगभरातील कोट्यवधी लोकांना त्यांच्या घरात कैद व्हावे लागले होते. दरम्यान, पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या थायलंडची राजधानी बँकॉकमधील रहिवाशांसाठी पुन्हा असाच आदेश जारी करण्यात आला आहे. या शहराची लोकसंख्या एक कोटीहून अधिक आहे. WHO च्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने बँकॉक आणि शेजारील प्रांतातील लोकांना घराबाहेर न पडण्याचा फर्मान जारी केला आहे.
यावेळी कारण कोविड-19 नसून दरवर्षी सुमारे 70 लाख लोकांचा जीव घेणारा 'राक्षस' आहे. वायुप्रदूषण असे या राक्षसाचे नाव आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) वाढत्या प्रदूषणाबाबत बँकॉक आणि त्याच्या शेजारील प्रांतांसाठी इशारा जारी केला आहे. WHO ने म्हटले आहे की थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये PM2.5 ची पातळी सामान्यपेक्षा 14 पटीने वाढली आहे. त्यामुळे प्रशासनाने लोकांना जास्तीत जास्त घरातच राहावे, असा सल्ला दिला आहे.
बँकॉकच्या हवेत विष
सुंदर समुद्रकिनारे आणि पर्यटन स्थळांसाठी प्रसिद्ध असलेल्या बँकॉकच्या हवेत विष मिसळले आहे. एअर क्वालिटी ट्रॅकिंग प्लॅटफॉर्म IQAir नुसार, बँकॉकची हवेची गुणवत्ता सध्या जगातील सहाव्या क्रमांकावर आहे. थायलंडच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने सांगितले की खराब हवामान, वाहनांचा धूर आणि शेतात लागलेल्या आगीमुळे धोकादायक कॉकटेल बनले आहे. त्यामुळे येथे श्वास घेणेही कठीण होत आहे.
घरून काम करा
वाहनांचे प्रदूषण कमी व्हावे यासाठी लोकांना घरातून काम करण्यास प्रवृत्त करत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो म्हणून शाळांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. वाढत्या प्रदूषणाचा परिणाम लोकांवर स्पष्टपणे दिसून येत आहे. लोक डोळ्यात जळजळ झाल्याची तक्रार करत आहेत. तसेच श्वास घेण्यासही त्रास होत आहे.