CoronaVirus: 'तो' भयंकर इशारा ऐकून अखेर डोनाल्ड ट्रम्प खडबडून जागे झाले, अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 02:17 AM2020-03-31T02:17:30+5:302020-03-31T14:39:38+5:30
अमेरिकेची अर्थव्यवस्था १२ एप्रिलला असलेल्या ईस्टरच्या आधी मोकळा श्वास घेऊ लागेल, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते
वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये कोरोना साथीने घातलेले थैमान लक्षात घेता, तेथे जाहीर करण्यात आलेली लॉकडाऊनची मुदत आणखी महिनाभराने वाढविण्याचा निर्णय राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे. या देशात केलेल्या लॉकडाऊनची मुदत सोमवारी संपणार होती; पण आता तिचा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आला आहे. येत्या दोन आठवड्यांत अमेरिकेत कोरोनाच्या बळींच्या संख्येत मोठी वाढ होणार असल्याचीही चिन्हे आहेत.
अमेरिकी सरकारचे संसर्गजन्य आजारांसंदर्भातील सल्लागार डॉ. अँथनी फौसी यांनी सांगितले, की कोरोनाचा अमेरिकेत लक्षावधी लोकांना संसर्ग होऊन १ लाखाहून अधिक जणांचा बळी जाऊ शकतो. हा इशारा अत्यंत गांभीर्याने घेऊन ट्रम्प यांनी त्यांच्या देशातील लॉकडाऊनची मुदत वाढविली.
अमेरिकेची अर्थव्यवस्था १२ एप्रिलला असलेल्या ईस्टरच्या आधी मोकळा श्वास घेऊ लागेल, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते; पण या साथीने धारण केलेल्या गंभीर स्वरूपामुळे ट्रम्प यांना आपला विचार बदलावा लागला आहे. कोरोनाचा झपाट्याने होणारा फैलाव लक्षात घेता अमेरिकेतील सर्व राज्यांमध्ये सार्वजनिक कार्यक्रमांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.
ट्रम्प यांनी सांगितले, की अमेरिकेने लॉकडाऊन पुकारला नसता तर कोरोनामुळे देशात २० लाखांहून अधिक बळी जाण्याची शक्यता होती. सध्या घातलेल्या निर्बंधांमुळे मृतांचा आकडा १ लाखांपेक्षा कमी करण्यात यश येईल. ज्येष्ठ नागरिकांनी, तसेच व्याधिग्रस्त लोकांनी घरामध्येच थांबावे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्याचे टाळावे, शक्यतो घरूनच काम करावे असे आदेश ट्रम्प सरकारने जनतेला दिले आहेत. तसेच, अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने, वाहतूक, आस्थापना, कारखाने, बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
२,४००पेक्षा अधिक जणांचा मृत्यू
अमेरिकेमध्ये १ लाख, ३९ हजारांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली असून २,४०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. प्रत्येकी तीन अमेरिकी नागरिकांपैकी एकाला घरीच थांबून राहण्याची सूचना सरकारने दिली आहे. न्यूयॉर्क, कनेक्टिकट, न्यूजर्सी येथील शहरी भागांना कोरोनाचा तडाखा मोठ्या प्रमाणावर बसला आहे.