CoronaVirus: मोठी बातमी; अखेर ७६ दिवसांनंतर चीननं घेतला महत्त्वाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 08:59 AM2020-04-08T08:59:28+5:302020-04-08T09:07:27+5:30
CoronaVirus कोरोनाचा केंद्रबिंदू ठरलेल्या वुहानमधील परिस्थिती नियंत्रणात
वुहान: सध्या संपूर्ण जगात कोरोनानं थैमान घातलं आहे. मात्र चीनमधील परिस्थितीत सुधारणा होत आहे. कोरोना विषाणू चीनच्या वुहानमधून जगभरात पसरला. वुहानमध्ये कोरोनानं शेकडो जणांचे बळी घेतले. पण आता वुहान पूर्वपदावर आलं असून तिथलं लॉकडाऊनदेखील हटवण्यात आलं आहे. गेल्या ७६ दिवसांपासून वुहानमध्ये लॉकडाऊन सुरू होतं. मात्र आता वुहानमधील नागरिकांना मोकळा श्वास घेता घेणार आहे.
कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन २३ जानेवारीला वुहान शहर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. वुहानची लोकसंख्या १ कोटी १० लाख इतकी आहे. वुहानमधून चीनच्या विविध भागांत कोरोनाचा विषाणू पसरला. चीनमध्ये कोरोनामुळे ३ हजार ३०० पेक्षा अधिक जणांचा बळी गेला. तर ८२ हजार जणांना बाधा झाली. चीन सरकारनं दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या काही आठवड्यांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वेगानं घट झाली आहे. मंगळवारी (काल) चीनमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही.
कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत असल्यानं वुहानमधील लॉकडाऊन हटवण्यात आलं असून नागरिकांना मुक्तपणे वावरण्याची परवानगी देण्यात आली आहे. याआधी फक्त अत्यावश्यक कामांसाठीच वुहानमधल्या नागरिकांना घराबाहेर पडता येत होतं. याशिवाय शहराच्या सीमादेखील बंद करण्यात आल्या होत्या.
लॉकडाऊन संपल्यानं शहरातल्या यांग्त्जी नदीच्या किनाऱ्यावर एका समारंभाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी आरोग्य सेवा देणारे कर्मचारी आणि कोरोनाचे रुग्ण यांची ऍनिमेटेड चित्रं साकारण्यात आली होती. लॉकडाऊन हटवण्याआधी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शहरातील रेल्वे स्थानकं आणि विमानतळाचा आढावा घेतला होता.