Locusts Attack: आफ्रिकेवर कोरोनापाठोपाठ आणखी एक मोठं संकट, कीटकनाशक फवारण्यासाठी सरकारला तैनात कराव लागलं विमान
By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 25, 2021 05:11 PM2021-02-25T17:11:24+5:302021-02-25T17:16:08+5:30
टांझानियातील जिल्हा आयुक्त ओनेस्मो बिसवेलू यांनी म्हटले आहे, की 'सिहा जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळपासूनच नाकतोड्यांच्या झुंडींनी हाहाकार माजवला आहे. या नाकतोड्यांचा सामना करण्यासाठी सरकारने कीटकनाशक फवारणीसाठी विमानच तैनात केले आहे. (Locusts Attack)
डोडोमा - आफ्रिकेपासून भारतापर्यंत कहर माजवणाऱ्या नाकतोड्यांच्या झुंडी (Locusts) पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहेत. आफ्रिकन (Africa) देश असलेल्या टांझानियाच्या (Tanzania) उत्तरेकडील किलिमंजारो भागात नाकतोड्यांनी भीषण हाहाकार माजवला आहे. यामुळे येथील शेतकरी धास्तावले आहेत. कारण त्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. यातच आता या झुंडी भारतात आणि पाकिस्तानातही येतात की काय, अशी भीती वाटू लगली आहे. (Locusts Attack northern region of Tanzania Africa damage crops india pakistan crisis will increase)
टांझानियातील जिल्हा आयुक्त ओनेस्मो बिसवेलू यांनी म्हटले आहे, की 'सिहा जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळपासूनच नाकतोड्यांच्या झुंडींनी हाहाकार माजवला आहे. या नाकतोड्यांचा सामना करण्यासाठी सरकारने कीटकनाशक फवारणीसाठी विमानच तैनात केले आहे. नाकतोड्यांवर नियंत्रण मिळविण्यात आम्हाला यश आले आहे. पिकांचे अधिक नुकसान झालेले नाही.' वातावरणात झालेल्या बदलामुळे पूर्व आणि उत्तर आफ्रिकेत या नाकतोड्यांचा हल्ला झाल्याचे मानले जात आहे.
केनियासमोर खाण्याचं संकट -
यापूर्वी, केनियामध्ये नाकतोड्यांचा सर्वात मोठा हल्ला झाला होता. यावेळी केनियाचे मोठे नुकसान झाले होते. यामुळे केनियाची परिस्थिती एवढी बिघडली होती, की त्यांच्या समोर दोनवेळच्या खाण्याचाही प्रश्न निर्माण झाला होता. नाकतोड्यांच्या या टोळ धाडीने आशिया आणि आफ्रिकन देशांत गेल्या वर्षापासूनच भयानक हाहाकार माजवला आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या टिकाणी पलायन करणाऱ्या या टोळ्या - Locusta migratoia जगात सर्वाधिक पसरल्या आहेत. यांच्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होते.
पाकिस्तानमार्गे भारतातही आली होती अशी टोळधाड -
गेल्या वर्षी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात नाकतोड्यांची टोळधाड पाकिस्तानहून राजस्थानात पोहोचली होती. राजस्थानातील 18 आणि मध्य प्रदेशातील जवळपास 12 जिल्ह्यांतील पिकांचे नुकसान करुन ही झुंड उत्तर प्रदेशातील झांसी आणि आग्र्यापर्यंत पोहचली होती. यावेळी उत्तर प्रदेश सरकारने संपूर्ण राज्यात सतर्कतेची घोषणा केली होती. या टोळधाडीने उत्तर प्रदेशातील 17 जिल्ह्यांना जाळ्यात ओढले होते. यात आग्रा, अलीगड, मथुरा, बुलंदशहर, हाथरस, एटा, फिरोजाबाद, मैनपुरी, इटावा, फारुखाबाद, कानपूर, झांशी, हमीरपूर आणि ललितपूर या जिल्ह्यांचा समावेश होता.