“अब की बार फिर मोदी सरकार”; भारतातील लोकसभा निवडणुकीच्या Exit Poll वर चीनची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 12:04 PM2024-06-03T12:04:01+5:302024-06-03T12:04:17+5:30
China On India Lok Sabha Election 2024 Result Exit Poll: भारताच्या लोकशाही निवडणुकीच्या एक्झिट पोलवर चीनने प्रतिक्रिया दिली आहे.
China On India Lok Sabha Election 2024 Result Exit Poll: लोकसभा निवडणुकीचा निकाल येण्यासाठी काही तास शिल्लक राहिले आहेत. एक्झिट पोलच्या आकड्यांवरून इंडिया आघाडी आणि एनडीएचे नेते अनेक दावे-प्रतिदावे करत आहेत. भारतातील लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारतात नेमके काय घडतेय, याकडे जगाची नजर आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी आलेल्या एक्झिट पोलवर थेट चीनकडून प्रतिक्रिया देण्यात आली असून, भारतात पुन्हा एकदा मोदी सरकार येऊ शकेल, असे म्हटले आहे.
चीनच्या ग्लोबल टाइम्सने याबाबत वृत्त प्रकाशित केले आहे. चीनमधील राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मोदी सरकार देशांतर्गत नीति आणि परराष्ट्र धोरण कायम ठेवेल. भारताच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी तसेच त्यात वृद्धी करण्यासाठी प्रयत्न कायम ठेवेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करू शकतील, असे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे.
भारत आणि चीनमधील मतभेद दूर होऊन संवाद कायम राहावा
चिनी तज्ज्ञांनी भारत आणि चीन यांच्यातील सहकार्यावर भर दिला. दोन्ही देशांमध्ये मतभेद दूर करण्यासाठी खुली चर्चा होईल. तसेच संवाद कायम राहील, अशी आशा ग्लोबल टाइम्सने व्यक्त केली आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणात काही बदल होण्याची अपेक्षा नाही. मोदी आणि त्यांचा पक्ष भाजपा तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यास माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनंतर तिसऱ्यांदा सत्तेत राहणारे ते दुसरे पंतप्रधान असतील, असेही म्हटले गेले आहे.
दरम्यान, बीजिंगच्या सिंघुआ विद्यापीठाच्या नॅशनल स्ट्रॅटेजी इन्स्टिट्यूटच्या संशोधन विभागाचे संचालक कियान फेंग म्हणाले की, निवडणुका जिंकल्यानंतर मोदींचे लक्ष काही वर्षांत अमेरिका आणि चीननंतर देशाला जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनविण्यावर असेल. मोदी धोरणात्मक राजकीय मुसद्देगिरीच्या माध्यमातून भारताचा जगभरातील प्रभाव वाढण्यावरही भर देण्याचा प्रयत्न करतील. चीनसोबतच्या संबंधांबाबत भारताने धोरणात्मक दृष्टिकोन ठेवणे महत्त्वाचे आहे. भारताने चर्चेद्वारे मतभेद दूर करण्यासाठी चीनला सहकार्य करावे. चीन आणि भारत यांच्यातील संघर्ष वाढण्याची शक्यता नाही. जपान आणि ऑस्ट्रेलियासारख्या अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांसह चीनचे अनेक देशांशी संबंध आता सुधारत आहेत, असेही या लेखात पुढे सांगितले आहे.