लंडन दुर्घटना- जीव वाचवण्यासाठी खिडक्यांमधून लोकांनी मारल्या उडया
By admin | Published: June 14, 2017 10:48 AM2017-06-14T10:48:19+5:302017-06-14T12:49:48+5:30
ग्रेनफेल टॉवरला लागलेल्या आगीने रौद्ररुप धारण केल्यानंतर काही रहिवाशांनी आपला जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या खिडक्यांमधून उडया मारल्या.
Next
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 14 - ग्रेनफेल टॉवरला लागलेल्या आगीने रौद्ररुप धारण केल्यानंतर काही रहिवाशांनी आपला जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या खिडक्यांमधून उडया मारल्या असे या इमारतीत राहणा-या अयुब असीफने सीएनएन वृत्तवाहिनीला सांगितले. टॉवरमध्ये अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी आपण बचाव पथकाच्या कर्मचा-यांना मदत केली असे अयुबने सांगितले. अयुबचा भाचा आणि चुलत भाऊ या आगीत जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आपणही काही रहिवाशांना इमारतीमधून उडया मारताना पाहिले असे ओमर चौधरी याने सांगितले. आगीच्या ज्वाळांमधून सुटका करुन घेण्यासाठी त्यांनी उडया मारल्या असे ओमर चौधरी म्हणाला. टॉवरचे सर्व 27 मजले आगीने वेढले असून, तुम्हाला दूरवर उभे राहिल्यानंतरही आग आणि धुराचे लोळ तुम्हाला दिसतील असे ओमर चौधरी म्हणाला. अग्निशामक दलाच्या चाळीस गाड्या आणि 200 जवानांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
गेल्या तीन ते चार तासांपासून सुरू असलेल्या आगीमुळे इमारतीचा एक भाग जळून खाक झाला आहे. तसंच आगीमुळे ही इमारत एका बाजूला झुकली गेली आहे. त्यामुळे ही इमारत कधीही पडू शकते, अशीही माहिती समोर येते आहे. रहिवासी परिसर असल्याने इमारत कोसळल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. डन फायर ब्रिगेडच्या माहितीनुसार, सुरूवातील दुसऱ्या मजल्यावर आग लागली होती. नंतर ही आग संपूर्ण इमारतीत पसरली.
"मी स्वयंपाक घरात असताना फायर अलार्म ऐकु आला. बाहेर पाहिल्यावर इमारतीचा उजवा भाग जळताना मला दिसला", अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शीने स्काय न्यूजला दिली आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. पश्मिम लंडनमधील लॅटिमेर रोडवरील लँकेस्टर वेस्ट इस्टेट परिसरात ही इमारत आहे.. पोलिसांच्या माहितीनुसार आत्तापर्यत दोन जण जखमी झाले आहेत.
लंडन अॅम्ब्युलन्स सेवेला रात्री 1.30 वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी 20 अॅम्ब्युलन्स तात्काळ घटनास्थळी पाठवल्या. गंभीर जखमी झालेल्यांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करीत आहेत. लंडनमधील अॅम्ब्युलन्स सेवेने ग्रेनफेल टॉवरच्या आसपासच्या इमारतीत रहाणा-या रहिवाशांना घराचे दरवाजे, खिडक्या बंद करुन घेण्यास सांगितले आहे. कारण धुराच्या लोटामुळे त्रास होऊ शकतो.