‘जबाबासाठी लंडनला या’
By admin | Published: July 21, 2016 05:17 AM2016-07-21T05:17:59+5:302016-07-21T05:17:59+5:30
मला काहीच दडवून ठेवायचे नाही. पण भारत सरकार दुष्ट हेतूने माझा पिच्छा पुरवत असल्याने मला तेथे जाणे शक्य नाही.
लंडन : मला काहीच दडवून ठेवायचे नाही. पण भारत सरकार दुष्ट हेतूने माझा पिच्छा पुरवत असल्याने मला तेथे जाणे शक्य नाही. त्यामुळे भारतीय तपासी यंत्रणांना माझे काही जाब-जबाब घ्यायचे असतील तर त्यांनी इथे लंडनमध्ये यावे किंवा ई-मेलने प्रश्न पाठवावेत, असा भन्नाट सल्ला वादग्रस्त उद्योगपती विजय मल्ल्या यांनी दिला आहे.
मल्या म्हणाले, ‘माझ्या बाबतीत जे काही सुरु आहे त्याचे वर्णन मी ‘पिच्छा पुरविणे’ याखेरीज अन्य प्रकारे करू शकत नाही. (पण) काहीही करून मला यातून निभावून बाहेर पडावेच लागेल. मल्ल्या म्हणाले, ‘माझ्या किंगफिशर एअरलाइन्सचे अनेक अधिकारी भारत सरकारला चौकशीसाठी (तेथे) उपलब्ध आहेत. शिवाय कंपनीची हजारो कागदपत्रेही मिळविणे त्यांना शक्य आहे. या उपरही त्यांना खुद्द मला काही विचारायाचे असेल तर त्यांनी इथे लंडनमध्ये येऊन मला विचारावे, रेडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून माझ्याशी बोलावे अथवा ई-मेलने प्रश्न पाठवावेत व मी त्याला उत्तरे देईन. मला काहीच दडवून ठेवायचे नाही. ’मल्ल्या पुढे असेही म्हणाले, ‘पण केवळ मी जातीने भारतात हजर नाही एवढ्यावररूनच माझ्याविरुद्ध अटक वॉरन्ट काढून माझा पासपोर्ट रद्द केला जावा हे मला जरा विरोधाभासी व चिंताजनक वाटते. यावरून त्यांच्या हेतूविषयी (ते स्वच्छ असल्याविषयी) मला कशी बरं खात्री वाटावी?’हा अनुभव आपल्याला नवीन नाही व यापूर्वी ही आपण हे सर्व सहन केले आहे, असे सांगताना मल्ल्या म्हणाले, तपासी अधिकाऱ्यांचा पहिला (कटु) अनुभव मला १९८५ मध्ये आला. मोठ्या तयारीनिशी दोन वर्षे ते माझ्याकडे येत राहिले व शेवटी त्यांना काहीही सापडले नाही व मी पूर्णपणे निर्दोष ठरलो. वाईट याचे वाटते की, भारतात तपासी यंत्रणा या राजकारण्याच्या हातातील खेळणे आहेत. (वृत्तसंस्था)
>डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द केला
मोटार शर्यतीच्या ‘फॉम्युला १’ स्पर्धेत उतरणाऱ्या ‘फोर्स इंडिया’ या संघाचे मालक असलेल्या मल्ल्या यांनी याच क्रीडाप्रकाराशी संबंधित ‘आॅटोस्पोर्ट’ या नियतकालिकास मुलाखत देताना वरीलप्रमाणे सल्ला देताना म्हटले की, भारत सरकारने माझा डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द केलेला असल्याने मला भारतात जाणे अशक्य आहे.