लंडन - जळत्या इमारतीतून वाचण्यासाठी महिलेने 10व्या मजल्यावरुन फेकलं बाळ
By admin | Published: June 15, 2017 11:48 AM2017-06-15T11:48:46+5:302017-06-15T11:56:25+5:30
ग्रेनेफल टॉवरला भीषण आग लागली असताना इमारतीत फसलेल्या महिलेने आपल्या पाच वर्षाच्या बाळाला दहाव्या मजल्यावरुन खाली फेकून दिलं
Next
>ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 15 - "देव तारी त्याला कोण मारी" या म्हणीला सार्थक ठरवणारी एक घटना लंडनमध्ये समोर आली आहे. ग्रेनेफल टॉवरला भीषण आग लागली असताना इमारतीत फसलेल्या एका महिलेने आपल्या पाच वर्षाच्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी त्याला दहाव्या मजल्यावरुन खाली फेकून दिलं. यावेळी खाली उभ्या असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने बाळाला झेललं आणि त्याचा जीव वाचवला.
लंडनमध्ये २४ मजली निवासी संकुलाच्या इमारतीला बुधवारी लागलेल्या अतिशय भीषण अशा आगीत १२ जण ठार, तर ७४ जण जखमी झाल्याचे जाहीर झाले असले, तरी मृतांची संख्या खूपच मोठी असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जखमींपैकी २० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. इंग्लडमध्ये गेल्या तीन दशकांतील आगीची ही सर्वात भीषण घटना आहे.
इमारतीला आग लागली तेव्हा अनेक कुटुंब आतमध्ये फसलेले होते. अग्निशमन दलाच्या 20 गाड्या आग नियंत्रित आणण्याचा, तसंच अडकलेल्यांना सुखरुप बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र आग इतकी भयंकर होती की, बचावकार्य करणं कठीण जात होतं. अशावेळी इमारतीत अडकलेल्या एका महिलेने आपल्या बाळाला दहाव्या मजल्यावरुन खाली फेकून दिलं. उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी गर्दीतून धावत आलेल्या एका व्यक्तीने बाळाला झेललं, आणि जीव वाचवला. बाळाच्या आईचा जीव वाचला की नाही याबाबत मात्र माहिती मिळू शकलेली नाही.
या घटनेची साक्षीदार असलेल्या समीरा लमरानी यांनी सांगितलं की, "खिडक्या उघडत नव्हत्या. इमारतीच्या नवव्या आणि दहाव्या मजल्यावर फसलेली एक महिला आपल्या बाळाला खाली फेकत असल्याचा इशारा करत होती. कोणी माझ्या बाळाचा झेल घेईल का ? असं विचारण्याचा प्रयत्न ती करत होती. त्यावेळी तिथे उभा असलेला एक व्यक्ती धावत आला, आणि बाळाचा झेल घेतला". बाळ पुर्णपणे सुरक्षित असल्याचं समीराने सांगितलं आहे.
लँकेस्टर वेस्ट इस्टेटमधील लॅटिमेर रस्त्यावरील ग्रेनफेल टॉवरला स्थानिक वेळेनुसार पहाटे १.१६ मिनिटांनी आग लागली. ही २४ मजली इमारत कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आत जाऊन आग विझविणे आणि अडकलेल्यांना बाहेर काढणे अग्निशामक दलाचे जवान आणि पोलीस यांना शक्य झालेले नाही.. सुमारे २०० अग्निशामक, ४० फायर ट्रक्स, २० रुग्णवाहिका घटनास्थळी उपस्थित होत्या. या इमारतीला नवे रूप देणे व नूतनीकरणावर १०.३ दशलक्ष पौंड खर्च करण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.