लंडनमध्ये महाराष्ट्राच्या लोकनृत्याचा जागर, आदिवासींचे 'पवारा नृत्य' गाजले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2019 08:42 PM2019-04-28T20:42:07+5:302019-04-28T20:42:58+5:30
भारतीय आदिवासी समुदायाचे सशक्तीकरण आणि त्यांच्या संस्कृतीबाबत जागतिक स्तरावर जागरूकता निर्माण करणे, हाच या कार्यक्रमाचा उद्देश होता.
युनेस्कोने (UNESCO) निर्धारित केलेल्या आंतरराष्ट्रीय नृत्य दिनानिमित्त 27 एप्रिल रोजी "नृत्य आणि विकास" या सदराखाली लंडनमध्ये मराठी लोकनृत्याचा जागर पाहायला मिळाला. महाराष्ट्राच्या पवारा आदिवासी नृत्यासोबतच कर्नाटकाचे सिद्दी नृत्य, मेघालयाचे गारो नृत्य आणि मिझोरमचे चेराव नृत्य सेंट्रल लंडनमध्ये सादर करण्यात आले. या लोकनृत्याचा मनसोक्त आनंद लंडनधमील भारतीयांनी घेतला.
भारतीय आदिवासी समुदायाचे सशक्तीकरण आणि त्यांच्या संस्कृतीबाबत जागतिक स्तरावर जागरूकता निर्माण करणे, हाच या कार्यक्रमाचा उद्देश होता. या कार्यक्रमात जंगलातील रहिवासी आणि आदिवासी समुदायासाठी कोणते नवीन उपक्रम आणि योजना आहेत, हेही सांगण्यात आले. उदा. आदिवासी तरुणांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम, किरकोळ वन उत्पादित गोष्टींसाठी किमान विक्री किंमत (MSP), केंद्रीय आदिवासी विद्यापीठांची स्थापना, आदिवासी संशोधन आणि श्रेष्ठता केंद्रे, एकलव्य मॉडेलवर आधारित निवासी शाळा, आदिवासी विषयक मंत्रालयातर्फे देण्यात येणारे फेलोशिप्स आणि शिष्यवृत्त्या. महाराष्ट्र सरकारतर्फे आदिवासी सशक्तीकरणासाठी केलेल्या अभूतपूर्व योजनांबद्दलची माहिती तुषार जोगे यांनी दिली.
स्मार्ट शेती पद्धती, आदिवासी शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान आणि आधुनिक शेतीची यंत्रसामग्री, उच्च प्रतीची बियाणे, तज्ज्ञ लोकांकडून रिअल-टाइम सल्ले उपलब्ध करून देणे इत्यादी गोष्टींबद्दल जोगे यांनी महत्त्वपूर्ण माहिती सांगितली. या कार्यक्रमासाठी नृत्य प्रदर्शन केलेल्या विशाखा टोकीकर, नीलम मोरे आणि लुम्बिनी बाफना यांनी लंडन येथे प्रशिक्षण घेतले. महाराष्ट्रात आणि भारतात असलेले वैविध्य दाखविण्याचा आणि त्याच्याबद्दलची जागरूकता वाढवण्यासाठी हा कार्यक्रम रागसुधा विंजामुरी यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुशील रापतवार यांनी मोलाचे योगदान दिले.