लंडनमध्ये धाडसत्र, अनेकांना अटक
By admin | Published: June 6, 2017 04:41 AM2017-06-06T04:41:57+5:302017-06-06T04:41:57+5:30
दोन दिवसांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पोलिसांनी दोन ठिकाणी धाडी टाकून काही संशयितांना अटक केली
लंडन : दोन दिवसांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पोलिसांनी दोन ठिकाणी धाडी टाकून काही संशयितांना अटक केली आहे. सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सुरू असताना लंडनमध्ये शनिवारी रात्री तीन अतिरेक्यांनी ऐतिहासिक लंडन ब्रिजच्या परिसरात कार घुसविली होती. यात सात जण ठार, तर ५० वर जखमी झाले होते. यातील २१ जणांची प्रकृती गंभीर आहे. या तीनही अतिरेक्यांना हल्ल्यानंतर काही वेळातच कंठस्रान घालण्यात आले.
इसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. लंडनमध्ये दोन ठिकाणी टाकलेल्या धाडीनंतर पोलिसांनी सांगितले की, काही संशयितांना अटक करण्यात आली आहे. पहाटे सव्वाचार वाजता अधिकाऱ्यांनी बर्किंगमध्ये दोन ठिकाणी धाडी टाकल्या आणि काही लोकांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी सध्या सुरू आहे.
आतापर्यंत ७ महिला आणि ५ पुरुषांना संशयावरून अटक करण्यात आली आहे. तसेच दहशतवादी हल्ला घडवून आणणाऱ्या तिघांचीही ओळख पटली आहे, असे पंतप्रधान थेरेसा मे यांनी सांगितले. त्यांची नावे लवकरच जाहीर करण्यात येतील, असेही त्या म्हणाल्या.
एरियानाच्या कार्यक्रमाला प्रतिसाद
मॅन्चेस्टर हल्ल्यातील पीडितांना मदतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या पॉप स्टार एरियाना ग्रांदे यांच्या कार्यक्रमाला येथे ५० हजार नागरिकांनी उपस्थिती लावली. यातून २.३५ मिलियन युरो एवढी मदत जमा झाली आहे. हा मदतनिधी आता ९.६५ मिलियन यूरोवर पोहोचला आहे.