लंडनचे महापौर सादिक खान प्रभावी
By admin | Published: October 22, 2016 01:14 AM2016-10-22T01:14:51+5:302016-10-22T01:14:51+5:30
लंडनचे महापौर सादिक खान ब्रिटनमधील सर्वात प्रभावशाली आशियाई आहेत. इंग्रजांच्या या देशातील प्रभावशाली आशियाई नागरिकांची यादी तयार करण्यात आली
लंडन : लंडनचे महापौर सादिक खान ब्रिटनमधील सर्वात प्रभावशाली आशियाई आहेत. इंग्रजांच्या या देशातील प्रभावशाली आशियाई नागरिकांची यादी तयार करण्यात आली असून, १०१ जणांचा
समावेश असलेल्या या यादीत पाकिस्तानी वंशाचे सादिक यांचे नाव सर्वात वर आहे.
सादिक यांच्याशिवाय नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला युसूफझई, हिंदुजा बंधू, लक्ष्मी मित्तल आणि संगीतकार जायन मलिक यांनीही या यादीत स्थान मिळविले. द्विभाषिक साप्ताहिक ‘गरवी गुजरात’ने तयार केलेल्या ‘जीजी२पॉवर लिस्ट’नुसार, सादिक खान यांनी ब्रिटनच्या राजधानीचे महापौर बनून इतिहास घडविला आहे. पार्क प्लाझा हॉटेलमध्ये गुरुवारी ‘जीजी२ लीडरशिप अवॉर्डस्’मध्ये भारताचे ब्रिटनमधील प्रभारी उच्चायुक्त दिनेश पटनायक यांनी ही यादी जाहीर केली. या यादीत माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून सरकारमध्ये व्यापार, नवोन्मेष आणि कौशल्यमंत्री राहिलेले साजीद जावेद दुसऱ्या क्रमांकावर, तर भारतीय वंशाच्या विद्यमान आंतरराष्ट्रीय विकासमंत्री प्रीती पटेल तिसऱ्या क्रमांकावर आहेत. नोबेल पुरस्कार विजेते सर व्यंकटरमन रामकृष्णन चौथ्या, एस.पी. हिंदुजा यांचा हिंदुजा परिवार सहाव्या क्रमांकावर आहे.