अख्ख्या विमानतळाची बत्ती गुल होते तेव्हा; लंडनचा हिथ्रो विमानतळ २४ तासांसाठी पडला बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 10:15 IST2025-03-21T10:15:10+5:302025-03-21T10:15:39+5:30
London Airport Fire: पावर स्टेशनला लागलेल्या भीषण आगीमुळे लंडनच्या पश्चिम भागातील हजारो घरांची देखील बत्ती गुल झाली आहे. याच पावर स्टेशनवरून विमानतळाला वीज पुरवठा केला जातो.

अख्ख्या विमानतळाची बत्ती गुल होते तेव्हा; लंडनचा हिथ्रो विमानतळ २४ तासांसाठी पडला बंद
सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेला लंडनचा हिथ्रो विमानतळ २४ तासांसाठी ठप्प झाला आहे. विजेच्या संयत्रामध्ये आग लागल्याने विमानतळाचा विद्युत पुरवठा बंद झाला आहे. यामुळे विमानतळाचे कामकाज, उड्डाणे सर्व बंद झाली आहेत. विमानतळ असा बंद पडणे ही तशी पहिलीच वेळ मानली जात आहे.
पावर स्टेशनला लागलेल्या भीषण आगीमुळे लंडनच्या पश्चिम भागातील हजारो घरांची देखील बत्ती गुल झाली आहे. याच पावर स्टेशनवरून विमानतळाला वीज पुरवठा केला जातो. यामुळे हा विमानतळही बंद करण्यात आला आहे. पावर स्टेशनला लागलेल्या आगीनंतर आजुबाजुच्या १५० लोकांना वाचविण्यात आले आहे. विमानतळानेही प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा पाहता शुक्रवारी विमानतळ बंद ठेवण्याशिवाय कोणता पर्याय नाहीय असे म्हटले आहे. एकही विमान या विमानतळावरून उड्डाण करू शकणार नाही, तसेच उतरूही शकणार नाही. यामुळे प्रवाशांनी विमानतळावर येऊ नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.
लंडनच्या हिलिंग्डन बरोमधील हेस येथे असलेले सबस्टेशन जळाले आहे. १० अग्निशमन गाड्या आणि सुमारे ७० अग्निशामक तैनात करण्यात आले असून आजुबाजुच्या लोकांना धुरामुळे आत राहण्यास आणि दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
फ्लाइट-ट्रॅकिंग वेबसाइट फ्लाइटराडार२४ नुसार, अनेक उड्डाणे आधीच वळवण्यात आली आहेत. तसेच विमानतळ अधिकाऱ्यांनुसार येते काही दिवस विमानांच्या परिचलनामध्ये व्यत्यय येत राहणार आहे. स्कॉटिश अँड सदर्न इलेक्ट्रिसिटी नेटवर्क कंपनी मध्य आणि दक्षिण इंग्लंड तसेच स्कॉटलंडच्या उत्तरेकडील सुमारे चार दशलक्ष घरांना वीजपुरवठा करते. या कंपनीने आगीची जागा रिकामी करण्यात आली आहे आणि स्थानिक रहिवासी, आमचे सहकारी आणि आपत्कालीन पथकांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे, असे सांगितले आहे.