लास वेगसमध्ये गोळीबारापूर्वी हल्लेखोराने फिलीपाइन्समध्ये गर्लफ्रेंडला पाठवले होते १ लाख डॉलर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2017 01:09 PM2017-10-04T13:09:29+5:302017-10-04T13:12:08+5:30
लास वेगस मधील एका संगीत समारंभात अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या स्टीफन पेडॉकने काही दिवसांपूर्वीच १ लाख डॉलर फिलीपाइन्सला पाठवले होते.
लास वेगस- लास वेगस मधील एका संगीत समारंभात अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या स्टीफन पेडॉकने काही दिवसांपूर्वीच १ लाख डॉलर फिलीपाइन्सला पाठवले होते. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार ६४ वर्षीय स्टीफनने त्याच्या गर्लफ्रेण्डला ही रक्कम पाठवली असल्याची माहिती समोर आली आहे. लास वेगसमध्ये झालेल्या या गोळीबारात 59 जणांचा मृत्यू झाला आहे. स्टीफनने हा प्रकार का केला? याचा पोलिसांना अजूनही शोध लागलेला नाही. पोलीसांकडून सध्या स्टीफनच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी केली जाते आहे. त्या तपासणीतून फिलीपाइन्समध्ये एक लाख डॉलर ट्रान्सफर झाल्याचं समोर आलं .स्टीफनला जुगार खेळण्याचाही नाद होता, असंही पोलिसांकडून समजतं आहे.
तपास अधिकाऱ्यांकडून स्टीफनच्या गर्लफ्रेण्डविषयी अधिक माहिती घेतली जाते आहे. तसंच या गोळीबाराबद्दल त्यांना काही माहिती आहे का ? या अनुषंगाने तपास केला जातो आहे. तसंच चौकशीसाठी तिला युएसमध्ये आणण्याची मागणी करण्यात आली आहे. आम्ही सध्या स्टीफनच्या मारिलोऊ डॅनली (वय 62) या मैत्रिणीच्या संपर्कात आहोत. जेव्हा गोळीबाराची घटना घडली तेव्हा त्या फिलीपाइन्समध्ये होत्या. तिच्याकडून लवकरच माहिती मिळवली जाईल, असं शेरीफ जोसेफ लोम्बार्डो यांनी सांगितलं. स्टीफनने गोळीबार करण्याच्या एक दिवस आधी पैसे ट्रान्सफर केल्याचं सांगितलं. पण या घटनेची चौकशी अजूनही सुरू असल्याने पोलीस अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती दिली नाही. तपास अधिकाऱ्यांकडून स्टीफनच्या पैशांच्या व्यवहारांची माहिती घेतली जाते आहे.
तपासात स्टीफनबाबत मागील ३ वर्षांतील २०० संशयास्पद माहिती समोर आली आहे. यात कॅसिनोमधील मोठ्या रकमेची देवाण-घेवाणीचा समावेश असल्याचं बोललं जातं
फिलीपाइन्स येथील खात्यात मागील आठवड्यात १ लाख डॉलरची रक्कम जमा करण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ६२ वर्षीय मारिलू डॅनली स्टीफनबरोबर राहत होती. पण, रविवारी ती फिलीपाइन्समध्ये होती. एवढी मोठी रक्कम त्याने आपल्या गर्लफ्रेण्डसाठी पाठवले होते की आणखी एखाद्या कारणासाठी हे अजून समजलेलं नाही.
लास वेगसचे मुख्य पोलीस अधिकारी जोसेफ लोबांर्डो म्हणाले की, या संपूण प्रकरणात डॅनलीकडून खूप महत्वाची माहिती समजू शकते. एफबीआय तिला अमेरिकेत आणणार आहे. तिच्याकडे स्टीफनने गोळीबार का केला, त्यामागे त्याचा काय उद्देश होता याची माहिती घेतली जाईल. तपास अधिकारी डॅनलीची चौकशी करत असून त्यांना याबाबत महत्वपूर्ण माहिती मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.
लास वेगसचा हल्ला इसिसचा नव्हे; तो माथेफिरुच, हॉटेलच्या खोलीत सापडल्या २३ बंदुका
अमेरिकेला हादरवणारा लास वेगस येथील हल्ला इसिसने केला नसून हल्लेखोर माथेफिरूच असल्याचे अमेरिकन गुप्तचर संस्था एफबीआयने सांगितले. इसिसने हा हल्ला केल्याचे कोणतेही पुरावे हाती लागलेले नाहीत, असेही एफबीआयने म्हटले आहे. संगीत समारंभात गोळीबारी करून ५९ जणांचा बळी घेणाऱ्या स्टिफन पॅडॉक या हल्लेखोराजवळ ‘बम्प स्टॉक’ नावाचे एक असे उपकरण होते जे सेमी ऑटोमॅटिक हत्याराचे रूपांतर पूर्ण ऑटोमॅटिक हत्यारात करू शकते. त्यातून प्रतिमिनिट ४०० ते ८०० राऊंड अशा गोळ्या चालतात. सेमी ऑटोमॅटिकमध्ये एक गोळी चालविण्यासाठी एकदा ट्रिगर दाबण्याची गरज असते, तर पूर्ण ऑटोमॅटिक हत्यारात एकदा ट्रिगर दाबल्यानंतर रायफलमधील पूर्ण गोळ्या संपेपर्यंत ते थांबत नाही. हल्लेखोर स्टिफन पॅडॉक यांच्या हॉटेलमधील खोलीत २३ बंदुका मिळाल्या आहेत. पॅडॉककडे दोन बम्प स्टॉक होते. या गोळीबारानंतर हल्लेखोराने स्वत:ला संपविले. त्याच्या घरातूनही बंदुका, स्फोटके आणि शस्त्रसाठा जप्त केला आहे