लैंगिक अत्याचाराचे मनावर आणि शरीरावर दीर्घकाळ परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 01:56 PM2018-10-04T13:56:19+5:302018-10-04T13:56:40+5:30
लैंगिक अत्याचाराचे केवळ मानसिक परिणामच नाहीत तर शारीरिक परिणामही आहेत असे या संशोधनातील प्रमुख अभ्यासक कॅरेस्टन कोनेन यांनी सांगितले. अशा अत्याचाराचे शरीरावर परिणाम होतात याचा पुरावा या संशोधनातून मिळाल्याचे व त्या परिणामांकडे लक्ष देण्याची गरज आहे असे कोएनन यांनी सांगितले.
न्यू यॉर्क- लैंगिक अत्याचाराचे किंवा नकोशा अनुभवाचे परिणाम कितीकाळ राहू शकतात त्याबद्दलची कटू आठवण किती काळानंतर उफाळून येऊ शकते याबद्दल मी टू कॅम्पेनमुळे अमेरिकेत सध्या मोठी चर्चा सुरु आहे. मात्र एका नव्या संशोधनातून लैंगिक अत्याचाराला किंवा दुर्वर्तनाला बळी पडलेल्या व्यक्तीला जबर मानसिक आणि शारीरिक किंमत मोजावी लागू शकते असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्या व्यक्तीला नैराश्य, काळजी, उद्वेग आणि पीटीएसडी म्हणजे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसॉर्डरचा सामना करावा लागतोच तसेच उच्च रक्तदाब आणि निद्रानाशाचाही त्रास होऊ शकतो असे या संशोधनात समोर आले आहे.
लैंगिक अत्याचाराचे केवळ मानसिक परिणामच नाहीत तर शारीरिक परिणामही आहेत असे या संशोधनातील प्रमुख अभ्यासक कॅरेस्टन कोनेन यांनी सांगितले. अशा अत्याचाराचे शरीरावर परिणाम होतात याचा पुरावा या संशोधनातून मिळाल्याचे व त्या परिणामांकडे लक्ष देण्याची गरज आहे असे कोएनन यांनी सांगितले. बॉस्टन येथिल टी.एच. चान स्कूल आॅफ पब्लिक हेल्थ येथे त्या प्राध्यापक आहेत. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी जेएएमए इंटर्नल मेडिसिन या नियतकालिकामध्ये ३ आॅक्टोबर रोजी निबंध प्रसिद्ध केला आहे. सॅन दिएगो येथे होणाऱ्या नॉर्थ अमेरिकन सोसायटी आॅफ मेनोपॉज या संस्थेच्या संमेलनातही तो वाचला जाईल. या अभ्यासाचा मूळ उद्देश ४० ते ६० या वयातील महिलांमधील रजोनिवृत्ती आणि धमनीकाठीन्य यांचा संबंध तपासणे हा होता. या संशोदनासाठी सरासरी वय ५४ असणाऱ्या ३०० महिलांची निवड करण्यात आली होती, त्या सर्व पिटसबर्गच्या रहिवासी होत्या. त्यांची शारीरिक तपासणी व मानसिकधक्क्यांसदर्भात प्रश्न त्यांना विचारण्यात आले होते.
यातील १९ टक्के महिलांनी कामाच्या ठिकाणी शाब्दिक किंवा शारीरिक अत्याचार अनुभवल्याचे तसेच २२ टक्के महिलांनी लैंगिक अत्याचाराचे आणि १० टक्के महिलांनी दोन्ही अनुभव गतकाळात आल्याचे सांगितले. त्यामध्ये लैंगिक अत्याचार आणि उच्च रक्तदाब यांचा संबंध असल्याचे दिसून आले. उच्च रक्तदाबाच्या नियंत्रणासाठी गोळ्या न घेणाऱ्या महिलांना हृद्यरोगाचा धोका असल्याचे आणि मेदाचे प्रमाणही जास्त असल्याचे दिसले. झोप पुरेशी न झाल्याने त्यांना निद्रानाशाचा धोकाही असल्याचे यात लक्षात आले.