जगातील सर्वांत लांब कार
By admin | Published: February 11, 2017 12:51 AM2017-02-11T00:51:22+5:302017-02-11T00:51:22+5:30
अमेरिकेतील एकाने जगातील सर्वांत लांब कार तयार केली आहे. सामान्य कारची लांबी सरासरी १६ फूट असते आणि ती चार चाकांवर धावते
वॉशिंग्टन : अमेरिकेतील एकाने जगातील सर्वांत लांब कार तयार केली आहे. सामान्य कारची लांबी सरासरी १६ फूट असते आणि ती चार चाकांवर धावते; परंतु या कारची लांबी ११० फूट असून, तिला तब्बल २4 चाके आहेत. ही कार रस्त्यावर धावताना वेगळेपणामुळे प्रत्येकाचे लक्ष वेधून घेते.
कॅलिफोर्नियाचे कस्टम कार गुरू जे आर्हबर्ग यांना कारच्या रुपड्यात बदल करून ते अधिक उठावदार करण्याचा छंद आहे. त्यांनीच ही कार तयार केली. ‘द अमेरिकन ड्रीम’ असे या कारचे नाव आहे. जगातील सर्वांत लांब लिमोजिन म्हणून ती ओळखली जाते. या कारची ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये नोंद झाली आहे. २७.१ कोटी रुपये मोजण्याची तयारी असेल, तर तुम्ही ही कार आपल्या घरी आणू शकता. लांबीशिवाय ऐषोआराम, स्टाईल आणि सुरक्षेबाबत ती इतर अव्वल कार्सच्या तोडीस तोड आहे. या कारमध्ये काय नाही. शाही बाथटब, डायव्हिंग बोर्ड, किंग साईज वॉटर बेड, लिव्हिंग रूम आणि दोन चालकांच्या खोल्या आहेत. विशेष म्हणजे या कारला सरळ किंवा मधून दुमडून चालविता येऊ शकते. तिला समोरून किंवा मागूनही चालविता येते. ही कार अनेक चित्रपटांत चमकली आहे. तिचे दोन भाग होऊ शकतात तसेच हे दोन भाग ट्रकमध्ये घालून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येतात. आपली लांबी आणि विशेष रचनेमुळे ही कार लोकांना आकर्षित करते.