ब्राझीलमध्ये सर्वाधिक लांब विजेचा विक्रम, ७०० किमी होता विद्युल्लतेचा लखलखाट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 02:16 AM2020-06-27T02:16:49+5:302020-06-27T02:17:03+5:30
या विजेने नवा जागतिक विक्रम नोंदवला असून, आजपर्यंतची ही सर्वांत जास्त लांबीची चमकलेली वीज मानली जात आहे.
संयुक्त राष्ट्र : ब्राझीलमध्ये मागील वर्षी ७०० किलोमीटर लांबीची वीज आकाशात लखलखली होती व हे अंतर बोस्टन-वॉशिंग्टन डीसीमधील अंतराच्या बरोबरीचे होते. या विजेने नवा जागतिक विक्रम नोंदवला असून, आजपर्यंतची ही सर्वांत जास्त लांबीची चमकलेली वीज मानली जात आहे.
जागतिक हवामान विज्ञान संघटनेच्या समितीच्या तज्ज्ञांनी म्हटले आहे की, सर्वांत जास्त लांबीची वीज व सर्वांत जास्त काळ आकाशात चमकलेल्या विजेचा विक्रम अनुक्रमे ब्राझील व अर्जेंटिनामध्ये नोंदले गेले आहेत. विजेच्या चमकवरून आकार व अवधीच्या तुलनेत हे दुप्पट क्षमतेचे विक्रम आहेत.
दक्षिण ब्राझीलमध्ये मागील वर्षी ३१ आॅक्टोबर रोजी आकाशात लखलखलेली वीज ७०० किलोमीटर एवढी लांब होती. हे अंतर लंडन व स्वीत्झर्लंडच्या बासेलमधील अंतराएवढे आहे.
यापूर्वी अमेरिकेच्या ओक्लाहोमा प्रांतात २००७ मध्ये दिसलेली वीज ३२१ किलोमीटर लांबीची होती.
उत्तर अर्जेंटिनामध्ये ४ मार्च २०१९ रोजी आकाशात तब्बल १६.७३ सेकंद वीज लखलखत होती. त्यापूर्वी दक्षिण फ्रान्समध्ये आॅगस्ट २०१२ मध्ये ७.७४ सेकंद वीज चकाकली होती.
हे दोन्ही विक्रम असाधारण आहेत, असे संयुक्त राष्टÑांच्या समितीचे म्हणणे आहे.